अबब...! ९६ महिलांच्या गळ्यातून हिसकावले ‘सौभाग्यलेणं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:00+5:302020-12-22T04:15:00+5:30
चालू वर्षी नाशिककरांना कोरोनाच्या साथीसह वाढत्या चोऱ्या, जबरी चोऱ्यांचा सामना करावा लागला. यामध्ये महिलांनाही दुचाकीस्वार चोरट्यांनी ‘लक्ष्य’ केले. लॉकडाऊन ...
चालू वर्षी नाशिककरांना कोरोनाच्या साथीसह वाढत्या चोऱ्या, जबरी चोऱ्यांचा सामना करावा लागला. यामध्ये महिलांनाही दुचाकीस्वार चोरट्यांनी ‘लक्ष्य’ केले. लॉकडाऊन शिथिल होताच सोनसाखळी चोरांच्या टोळीने शहरात उच्छाद मांडला होता. सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यात चोरट्यांनी सात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेत सुमारे अडीच लाखांचे सोने लुटले होते. सप्टेंबरपासून सोनसाखळी चोरीचा आलेख हा सातत्यानेे चढता राहिल्याचे दिसून येते. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चोरट्यांनी एकाच दिवशी तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हिसकावून पोबारा केला होता. याच महिन्यात उपनगरच्या मातोश्रीनगर भागात एका पोलीस पत्नीचीही सोनसाखळी चोरट्यांनी ओढून पळ काढला होता. नोव्हेंबर महिन्यातसुद्धा सोनसाखळी चोरीचा सिलसिला सुरूच राहिला आणि आता या महिन्यातही सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात १९ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी लांबविल्या होत्या. सोनसाखळी चोरांनी यावर्षी नाशिक शहर पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहे. मागील वर्षी ८२ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी हिसकावून पळ काढला होता. त्यापैकी केवळ आठ गुन्हे उघडकीस आले होते. यावर्षी ९६ पैकी ३२ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
--इन्फो--
पोलिसांना सोडावा लागणार नववर्षाचा संकल्प
नवीन वर्षात गुन्हे उघडकीस आणण्याचे तसेच नव्याने सोनसाखळी चोरीच्या घटना घडू न देण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांपुढे राहणार आहे. आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांनी जर नववर्षाचा संकल्प करून आपल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोणत्याही महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली जाणार नाही, यासाठी दक्ष राहण्याची मागणी नाशिककर महिलांच्या वतीने होत आहे. संशयितांच्या वेळीच मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.
---
‘चेन स्नॅचिंग’चा प्रतीकात्मक लोगो वापरावा.