अभोणा चौफुलीवरील खड्ड्यांना केला तात्पुरता मुलामा
By admin | Published: July 20, 2016 11:58 PM2016-07-20T23:58:26+5:302016-07-20T23:58:52+5:30
साई समर्थ ग्रुपतर्फे निवेदन : कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी
कळवण : अभोणा चौफुली परिसरात रस्त्याच्या कडेला पडलेले मोठमोठे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत होते. रस्ते खोदाईमुळे पडलेल्या चाऱ्या व खड्डे यात पावसाचे पाणी साचून अभोण्यातील रस्त्यांना गटारीचे स्वरूप प्राप्त झाले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अभोणा चौफुलीवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविले; मात्र या तात्पुरत्या डागडुजीची अभोण्यातील जनतेने नाराजी व्यक्त केली असून, येथील साई समर्थ ग्रुपने कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यापासून येथील चौफुलीवर मोठेमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे होते. पण ते नियमितपणे केले जात नसल्याने दरवर्षी खड्ड्यांची मालिका वाढत चालली असून, जुन्या खड्ड्यांची लांबी व खोलीही वाढत आहे.
यंदाही पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची विशेष दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पहिल्याच जोरदार पावसात रस्तादुरुस्तीचे पितळ उघडे पडले. दरम्यान, याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच कळवण सार्वजनिक विभागाने धसका घेत, सोमवारी १८ जुलै रोजी अभोणा चौफुलीवरील खड्डे खडी व मुरमाने तात्पुरते बुजवले.
मंगळवारी सकाळी चौफुलीवरील खड्ड्यांचे काम त्वरित होत नसल्याने अभोणा येथील साई समर्थ ग्रुपने रास्ता रोको व खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचे निवेदन दिले होते.
मात्र खड्डे बुजण्याचे काम आज सुरू झाल्याने त्यांनी रास्ता रोको थांबविला.
यावेळी साई समर्थ ग्रुपने उपअभियंता चव्हाण तसेच
अभोणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना निवेदन दिले. यावेळी चेतन दिवाण, रोषण वाघ, अनिकेत सोनवणे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, मयूर सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी,
दिलीप सोनवणे, राजेंद्र बागुल, विशाल हिरे, कुणाल जाधव, संकेत बिरार,अमित शहा आदि उपस्थित होते. (वार्ताहर)