मराठा आरक्षण: नाशिक मनपाने तपासल्या सुमारे १ लाख नोंदी, ४६१ कुणबी नोंद संख्या आढळली

By Suyog.joshi | Published: November 9, 2023 03:00 PM2023-11-09T15:00:33+5:302023-11-09T15:01:09+5:30

शाळाप्रवेशाच्या नोंदी तपासणार, ८३६ शिक्षक लागले कामाला

About 1 lakh records were checked by Nashik Municipality, 461 Kunbi records were found | मराठा आरक्षण: नाशिक मनपाने तपासल्या सुमारे १ लाख नोंदी, ४६१ कुणबी नोंद संख्या आढळली

मराठा आरक्षण: नाशिक मनपाने तपासल्या सुमारे १ लाख नोंदी, ४६१ कुणबी नोंद संख्या आढळली

नाशिक (सुयोग जोशी) : राज्यात कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या कुणबी मराठा, मराठा कुणबीचे दस्तऐवज शोधण्यास मंगळवार (दि. ७) पासून सुरुवात केली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत महापालिकेच्या शिक्षण विभागाने १,१८,४५४ नोंदींची तपासणी केली असून त्यात ४६१ कुणबी नोंद संख्या आढळली आहे. मराठा कुणबी ११ तर कुणबी मराठा यांच्या ५ नोंदी आढळल्या आहेत. या नोंदी १८९७ ते १९२९ या काळातील आहेत. आतापर्यंत एकूण १४३ पृष्ठ स्कॅन करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेचे सर्व शिक्षक व जन्म-मृत्यू नोंद विभागातील कर्मचारी कामाला लागले आहेत. विशेषतः मोडी लिपीत नोंदी असल्याने महापालिकेने जाणकारांकडून कागदोपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सोमवारी (दि. ६) बैठक घेत कुणबी प्रमाणपत्र शोधण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर तात्काळ या नोंदी शोधण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे यांनी उपोषण पुकारल्यानंतर राज्य शासनाच्या आश्वासनानंतर पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर युद्धपातळीवर कुणबी प्रमाणपत्र शोधण्याची मोहीमच राज्य शासनाने घेतली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील कुणबी प्रमाणपत्रे चार दिवसांत शोधली जाणार आहेत. विशेषत: १८९७ ते १९६७ या दरम्यान मराठा कुणबी व कुणबी मराठा जातसंवर्ग शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिक्षण व आरोग्य विभागाच्या मदतीने जातसंवर्ग शोधले जाणार असून हे अभियान फत्ते होत नाही तोपर्यंत महापालिकेच्या शिक्षकांसह जन्म-मृत्यू नोंद विभागातील कर्मचाऱ्यांनी कुठलीही सुट्टी न घेता काम मार्गी लावण्याचे निर्देश करंजकर यांनी दिले आहेत.

शाळाप्रवेशाच्या नोंदी तपासणार

कुणबी नोंदी शोधण्याच्या सूचना आयुक्तांनी देत नोंदी शोधल्या जाणार आहेत. मराठा कुणबी व कुणबी मराठा जातसंवर्ग शोधण्यासाठी १८९७ ते १९६७ मधील जन्मनोंदी तसेच शाळेत प्रवेशावेळीच्या नोंदी तपासल्या जात आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी पालिकेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

८३६ शिक्षक लागले कामाला

कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात शिक्षण विभागातर्फे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत २२ केंद्रप्रमुखांची बैठक घेण्यात आली. त्यात केंद्रप्रमुखांसह महापालिकेच्या शाळेच्या ८३६ शिक्षकांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून येत्या तीन दिवसांत सदर काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: About 1 lakh records were checked by Nashik Municipality, 461 Kunbi records were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.