सुमारे २४ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:28+5:302021-09-09T04:19:28+5:30
वणी : महाराष्ट्र शासनाने लोकआरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ पानमसाला विक्री हेतूने मानवी शरीरास अपायकारक, कर्करोगास आमंत्रण ...
वणी : महाराष्ट्र शासनाने लोकआरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ पानमसाला विक्री हेतूने मानवी शरीरास अपायकारक, कर्करोगास आमंत्रण देणारा प्रतिबंधित ऐवज पकडला असून, चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे. पंधरवड्यातील दिंडोरी पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे.
याबाबत माहिती अशी, गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याने दिंडोरी पोलिसांनी पेठ टोलनाका परिसरात सापळा लावला असता पिकअप गाडी (एमएच १५ एचएच १०८७) आली. संशयावरून पोलीस पथकाने पिकअपची तपासणी केली असता विविध रंगांच्या व आकाराच्या गोण्यांमधे पाकिटात पॅक असलेला १६ लाख ८० हजार ९२० रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू व सात लाखांची पिकअप जप्त करण्यात आली.
याबाबतची माहिती नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांना देऊन त्यांना पाचारण करण्यात आले. हा ऐवज प्रतिबंधित असल्याची खात्री पटल्यानंतर देशमुख यांनी दिंडोरी पोलिसांत याविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास अटक करण्यात आली. मुज्मील काफिल शेख (लय ३०, पठाणपूर जुने नाशिक) (चालक) याला गजाआड करण्यात आले आहे. सुनील गग सेंटर, ग्राऊंड प्लोअर शॉप नंबर ९, सर्कल प्लाझा सारडा सर्कल, पुनारोड नाशिक, उत्पादक पेढी व्हायब्रंट प्रॉडक्ट्स, सविलेजक वलसाड, नेमी प्रॉडक्ट्स, वलसाड अशा चौघांविरोधात अन्न सुरक्षा कायद्यान्वये व विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी पोलिसांची गेल्या आठवडाभरातील ही दुसरी कारवाई आहे. पहिल्या सापळ्यात २९ लाख रुपयांचा प्रतिबंधित ऐवज जप्त केला होता. आता वाहनासहित २३ लाख ८० हजार ९२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. काही कालावधीपूर्वी वणी पोलिसांनी सुमारे दोन कोटींचा प्रतिबंधित ऐवज पकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक केली होती.