घरपट्टी-पाणीपट्टीचे सुमारे ३३ कोटी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:37 PM2020-01-23T23:37:54+5:302020-01-24T00:40:11+5:30
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरून कारवाई होण्यापासून दूर रहावे व मनपास सहकार्य करावे यासाठी गुरुवारी (दि.२३) घरपट्टी व पाणीपट्टीमधील पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी सिडको भागात फिरून घरोघरी जाऊन कर भरण्यासाठी प्रबोधन केले.
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरून कारवाई होण्यापासून दूर रहावे व मनपास सहकार्य करावे
यासाठी गुरुवारी (दि.२३) घरपट्टी व पाणीपट्टीमधील पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी सिडको भागात फिरून घरोघरी जाऊन कर भरण्यासाठी प्रबोधन केले.
मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास घरपट्टीचे ५१ कोटी व पाणीपट्टीचे २२ कोटी मिळून सुमारे ७३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी सोमवारी (दि.२०) पर्यंत घरपट्टीची २२ कोटी इतकी वसुली झाली असून, अजूनही २९ कोटी इतकी थकबाकी आहे, तर पाणीपट्टीची ११ कोटी इतकी वसुली झाली असून, अजूनही ११ कोटी थकबाकी आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची अजूनही थकबाकी असल्याने नागरिकांनी थकबाकी भरण्यासाठी मनपाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
ज्या करदात्यांनी अजूनही घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली नाही अशा करदात्यांना मनपाच्या वतीने स्मरण पत्र तसेच नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. थकबाकीदारांनी थकबाकी भरावी यासाठी मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.२३) घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील कर्मचाºयांच्या वतीने सिडको भागातून रॅली काढण्यात आली.
सहकार्य करण्याचे आवाहन
मनपाच्या वतीने १६ डिसेंबरपासून अभय योजनेच्या माध्यमातून करामध्ये सूट देण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याचा अनेक करदात्यांनी लाभ घेतला असून, या योजनेत ३१ जानेवारी २०२० पर्यंत ७५ टक्के शास्ती सूट तर १ फेब्रवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत ५० टक्के शास्ती सूट देण्यात आली असल्याने ज्या नागरिकांनी कर भरलेला नाही त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.