सुमारे ५०० किलो दिवाळीचा फराळ विदेशात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:47 AM2017-10-26T00:47:33+5:302017-10-26T00:47:38+5:30
दिवाळीला घरी येऊ न शकलेल्या परदेशातील आपल्या आप्तेष्टांना निदान घरगुती फराळाची चव चाखायला मिळावी म्हणून नातेवाइकांनी आपल्या परदेशस्थित आप्तेष्टांना सुमारे ५०० किलोचा फराळ नाशिकहून रवाना केला आहे. टपाल खात्याच्या फराळ पाठविण्याच्या सुविधेच्या माध्यमातून नाशिकमधील फराळ थेट अमेरिका आणि रशियात पोहचला आहे. विशेष म्हणजे, यंदा यातील काही फराळ हा चीनलादेखील रवाना झाला आहे.
नाशिक : दिवाळीला घरी येऊ न शकलेल्या परदेशातील आपल्या आप्तेष्टांना निदान घरगुती फराळाची चव चाखायला मिळावी म्हणून नातेवाइकांनी आपल्या परदेशस्थित आप्तेष्टांना सुमारे ५०० किलोचा फराळ नाशिकहून रवाना केला आहे. टपाल खात्याच्या फराळ पाठविण्याच्या सुविधेच्या माध्यमातून नाशिकमधील फराळ थेट अमेरिका आणि रशियात पोहचला आहे. विशेष म्हणजे, यंदा यातील काही फराळ हा चीनलादेखील रवाना झाला आहे. आनंद, सुख-समृद्धी आणि प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीची सर्वांनाच ओढ असते. दिवाळीतील फराळ, फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांचा प्रकाश, रांगोळ्यांनी सजलेले अंगण, नवे कपडे या साºयांनी वातावरणात चैतन्य बहरते. यामुळेच या सणाला प्रत्येकाला घराची ओढ लागते. घरापासून दूर असलेले आवर्जून घरी येऊन दिवाळीचा आनंद लुटतात. मात्र साºयांनाच हे शक्य होत नाही. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे देश-विदेशात स्थायिक झालेल्यांना घरातील या आनंद सोहळ्याचा भाग होता येत नाही. आपल्या माणसांपासून दूर असलेल्या अशा आपल्या माणसांना दिवाळीत निदान घरचा फराळ तरी मिळावा या भावनेतून नाशिकहून सुमारे ५०० ते ५५० किलोचा फराळ विदेशात टपाल खात्याच्या माध्यमातून नाशिककरांनी पाठविला आहे. दिवाळीतील फराळ पाठविण्याची टपाल खात्याची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून नाशिकमधील असंख्य नागरिकांनी देश-विदेशात राहत असलेल्या आपल्या माणसांचा दिवाळीचा फराळ आवर्जून पाठविला.