स्क्रिझोफेनियाचे सुमारे ८० टक्के रुग्ण उपचारापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:18 AM2018-05-24T00:18:21+5:302018-05-24T00:18:21+5:30
आजही मानसिक आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर अज्ञान, तिरस्कार व कलंकाची भावना आहे़ सर्वसाधारणपणे १ टक्का लोकांना गंभीर मानसिक आजार (मेजर मेंटल डिसआॅर्डर) व ५ ते ६ टक्के लोकांना सामान्य मानसिक आजार (कॉमन मेंटल डिसआॅर्डर) होण्याची शक्यता असते.
नाशिक : आजही मानसिक आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर अज्ञान, तिरस्कार व कलंकाची भावना आहे़ सर्वसाधारणपणे १ टक्का लोकांना गंभीर मानसिक आजार (मेजर मेंटल डिसआॅर्डर) व ५ ते ६ टक्के लोकांना सामान्य मानसिक आजार (कॉमन मेंटल डिसआॅर्डर) होण्याची शक्यता असते. मात्र, आजही सुमारे ८० टक्के रुग्ण मानसिक आजाराच्या उपचारापासून दूर आहेत़ या आजारात औषधोपचार, मानसोपचार आणि क्वचित हॉस्पिटलायजेशन व अन्य उपचारांची आवश्यकता असून, वेळेवर उपचार व उपचारातील सातत्यामुळे या आजारातून रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतो, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे़ मानसिक आजार झालेल्या रुग्णाला खूप उशिरा उपचार मिळतात, यादरम्यान त्या रुग्णाचे व कुटुंबीयांचे अतोनात हाल झालेले असतात़ वैद्यकीयशास्त्रात प्रगती झाली असली वा उपचारपद्धती उपलब्ध असल्या तरी केवळ रुग्णांना व कुटुंबीयांना या आजाराची लक्षणे ओळखता येत नाहीत तसेच उपचारांची माहिती नसल्यामुळे आणि सामाजिक कलंकपणाच्या भावनेमुळे रुग्णांची हेळसांड वर्षानुवर्षे सुरूच आहे. या आजारातील रुग्णांचे विदारक चित्र बदलण्यासाठी स्क्रिझोफेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) गत वीस वर्षांपासून जनजागृतीचे कार्य करीत आहे. मानसिक आजाराचे स्वरुप वरकरणी कळत नाही, त्यामुळे रुग्ण व नातेवाईक गोंधळून जातात. त्यातच त्यांना भलभलते सल्लेही दिले जातात. बुवाबाजी केली जाते. रुग्णाला इच्छाशक्तीच नाही असे गैरसमज नातेवाइकांच्या बाबतीत घडतात. मनोविकार हा शारीरिक आजाराचाच एक भाग आहे असे वाटणाऱ्यांची संख्या तुरळक असते. गैरसमजामुळे बºयाचदा वेळेचा अपव्यय होतो व रुग्ण उपचारांपासून लांब राहतो़ वास्तविक मानसिक आजार हा मेंदूचा आजार म्हणजे शारीरिक आजारच आहे; परंतु आजही मानसिक आजाराकडे समाजात कमीपणाच्या भावनेने बघितले जाते. मानसिक आजारांमुळे त्या व्यक्तीची व कुटुंबाची अवहेलना होण्याची शक्यता असते. कुटुंबाला लाज वाटेल अशी गोष्ट झालेली आहे अशा दृष्टीने बघितले जाते. रुग्णात इच्छाशक्तीचा अभाव आहे, रुग्ण केव्हाही हिंसक होऊ शकतो, मनोविकार पूर्णपणे आनुवंशिक आहेत, रुग्णापासून कायम लांबच राहिले पाहिजे असे विविध प्रकारचे गैरसमजदेखील समाजात आढळून येतात. त्यामुळे मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय एकटे पडतात. त्यांना समाजाकडून आवश्यक असणारा आधार अत्यंत महत्त्वाच्या वेळी दुरावला जातो.