इंधन गळतीने सुमारे सव्वा कोटींचे नुकसान

By admin | Published: January 29, 2017 12:44 AM2017-01-29T00:44:37+5:302017-01-29T00:44:52+5:30

दोन लाख लिटर डिझेल निकामी : जमीनमालक व जेसीबी चालकाविरोधात गुन्हा

About half a million crores of fuel loss | इंधन गळतीने सुमारे सव्वा कोटींचे नुकसान

इंधन गळतीने सुमारे सव्वा कोटींचे नुकसान

Next

सिन्नर : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीच्या मुंबई ते मनमाड या इंधनवाहिनीस सिन्नर तालुक्यातल्या आगासखिंड शिवारात शुक्रवारी गळती लागली होती. यामुळे सुमारे दोन लाख लिटर डिझेल निकामी होऊन १ कोटी २६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भारत पेट्रोलियमचे नाशिक उपप्रबंधक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जमीनमालक व जेसीबी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सिन्नर तालुक्यातल्या आगासखिंड शिवारातील गट नंबर २६१/२ मध्ये जेसीबी मशिनद्वारे जमीन सपाटीकरणाचे काम सुरु होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेसीबी मशिनच्या रॉक ब्रेकरने खोदाई करीत असतांना इंधनवाहिनी फुटली होती. यावेळी सदर इंधनवाहिनीद्वारे मुंबईहून मनमाडकडे डिझेल पुरवठा सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात गळती झाली. घटनास्थळावर इंधनवाहिनीतून प्रचंड दाबाने डिझेलचे कारंजे उडत होते. त्यामुळे परिसरात डिझेलचे तळे साचले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मनमाड नियंत्रण कक्षामार्फत वशाळा (कसारा) येथील युनिटमधून डिझेलचा प्रवाह बंद करण्यात आला होता.  याप्रकरणी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे उपप्रबंधक मनीष धोंडीराम बळवंत यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन जमीनमालक उमेश बाबूराव मोजाड, रा. आगासखिंड व जेसीबी डोझर मशीनचालक श्रीराम बाबूलाल राऊत, रा. जांभूरटोल, ता. आमगाव, जि. गोंदीया यांच्या विरोधात पेट्रोलियम अ‍ॅण्ड मीनरल पाईप अ‍ॅक्वीसेशन आॅफ अ‍ॅक्ट २०११ नुसार कलम १५ (२) अन्वये व ज्वलनशील पदार्थाबाबत हलगर्जीपणा, सार्वजनिक आरोग्यास अपाय होईल, मालमत्तेस नुकसान पोहचेल व इतर व्यक्तींची सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केले म्हणून कलम २८५, २७८, ३३६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोकरे अधिक तपास करीत आहे. इंधन वाहिनी दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून रविवारी सायंकाळपर्यंत इंधन वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (वार्ताहर)





 

Web Title: About half a million crores of fuel loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.