सुमारे लाखाचा ऐवज लंपास : महिलेवर दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचार
By admin | Published: October 17, 2014 11:06 PM2014-10-17T23:06:45+5:302014-10-17T23:07:07+5:30
चोरट्यांच्या मारहाणीत वृद्धा जखमी
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर शिवारात अज्ञात चोरट्यांनी आव्हाड वस्तीवर मारहाण करीत तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांच्या मारहाणीत ६५ वर्षीय वृद्धा जखमी झाली. तिच्यावर दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण निर्माण झाली आहे.
दोडी-दापूर रस्त्यावर चंद्रभान वाळीबा आव्हाड यांची वस्ती आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पाठीमागील खिडकीच्या लोखंडीपट्ट्या व गज वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर पाठीमागील दरवाजा उडल्यानंतर चोरट्याच्या साथीदाराने आत प्रवेश केला.
घरात असलेल्या दोन लोखंडी पेट्या उघडत असताना पार्वताबाई वाळीबा आव्हाड यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड करताच चोरट्याने त्यांच्या डोक्यावर काठीने वार केला. त्यानंतर त्यांच्या नाकातील नथ ओरबडून घेतली. चंद्रभान आव्हाड यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली.
चोरट्यांनी घरात ठेवलेल्या लोखंडी पेटीतील दीड व एक तोळ्याची सोन्याची पोत, मणीमंगळसूत्र, अर्ध्या तोळ्याची सोन्याची चैन व लहान मुलांचे ओमपान असा सोन्याचा ऐवज व काही रोकड घेऊन पोबारा केला. आव्हाड यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी दगडफेक केली. त्यात आव्हाड यांच्या हाताला दुखापत झाली. जखमी चंद्रभान आव्हाड यांना तातडीने दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चोरट्यांनी डोक्यात काठीने प्रहार केल्याने त्यांच्या डोक्याला टाके घालण्यात आले व नाकातून नथ ओरबडून नेल्याने नाकाला दुखापत झाली.
घटनेची माहिती नांदूरशिंगोटे दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळाल्यानंतर हवालदार सानप, जगदाळे यांच्यासह वावी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पहाटे घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनास्थळी सकाळी निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे, वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पाहणी केली.
नाशिक येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वासाने काही अंतरापर्यंत माग काढण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी आलेल्या ठसेतज्ज्ञांनी पाहणी करून काही ठसे घेतले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील अधिक तपास करीत आहे.