प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरकडून अत्याचार; नाशिकमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 02:09 PM2022-09-13T14:09:28+5:302022-09-13T14:10:00+5:30
नाशिक - एका खासगी दवाखान्यात नोकरीला असलेल्या अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर दवाखान्यातील ५० वर्षीय डॉक्टरने बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती ...
नाशिक- एका खासगी दवाखान्यात नोकरीला असलेल्या अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर दवाखान्यातील ५० वर्षीय डॉक्टरने बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१०) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
खासगी रुग्णालयाच्या खोलीत राहणाऱ्या एका सोळावर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेला डॉक्टरने हाक मारली. यावेळी पीडिता खोलीत एकटीच असल्याचे बघून संशयित डॉक्टरने हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या खोलीत प्रवेश करीत दरवाजा बंद करून घेतला. कुटे यांनी पीडित परिचारिकेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक संबंध केले. यानंतर झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पाेस्को) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच संशयित कुटे यास अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी सांगितले. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख व महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ या करीत आहे.