अभाविपने तोडले अभ्यासिकेचे कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:10 AM2019-05-12T01:10:19+5:302019-05-12T01:11:19+5:30
महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या सुमारे तीनशे मालमत्तांपैकी अशोकस्तंभावरील रॉकेल गल्लीतील श्रीपाद मित्रमंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासिकेचे कुलूप तोडून अभाविपने शनिवारी (दि. ११) दुपारी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली.
नाशिक : महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या सुमारे तीनशे मालमत्तांपैकी अशोकस्तंभावरील रॉकेल गल्लीतील श्रीपाद मित्रमंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासिकेचे कुलूप तोडून अभाविपने शनिवारी (दि. ११) दुपारी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली.
यावेळी अभाविपच्या आंदोलकांनी अभ्यासिका बंद करण्यावरून प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली, तसेच शहरातील अन्य ठिकाणांची वाचनालये व अभ्यासिका खुल्या करण्यासाठी अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा संदर्भ देत विविध संस्था, संघटनांना भाडेतत्त्वावर दिलेल्या मिळकती ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. यात करारनामा नसलेल्या, कराराची मुदत संपलेल्या तसेच नाममात्र भाडेतत्त्वावर मिळकत ताब्यात ठेवणाऱ्या संस्था, संघटनांकडून मिळकती खाली करून त्यांना सील लावण्याची कारवाई प्रशासनाने केल्याने शहरातील सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेने शहरातील विविध अभ्यासिकांना कुलूप लावल्याने ऐन परीक्षांच्या काळाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. ८) मनपा आयुक्तांची भेट घेत अभ्यासिका खुल्या करण्याचे निवेदन दिले होते. मात्र, दोन दिवसांत महापालिकेतर्फे या प्रकरणी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी (दि. ११) दुपारी २ वाजेच्या सुमारास अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कुलूप तोडत अभ्यासिकेत प्रवेश केला. यावेळी अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, शहराध्यक्ष सागर शेलार, नितीन पाटील, सौरभ धोत्रे, शर्वरी अष्टपुत्रे, गौरी पवार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान
महापालिकेने शहरातील जवळपास तीनशे मिळकतींवर अशाच प्रकारे कारवाई करीत सील केल्या आहेत. यात जवळपास १७ ते १८ अभ्यासिकांचा समावेश असून, या अभ्यासिकांमध्ये जवळपास ५ ते ६ हजार विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र, महापालिकेने या अभ्यासिकांनाच कुलूप ठोकल्याने ऐन परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासिकाचालकांकडे पुढील सहा महिन्यांचे शुल्क भरले आहे. असे असताना चालक आणि महापालिकेच्या भांडणात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे अभाविपने म्हटले आहे.