उदय सामंत यांना अभाविपने दाखवले काळे झेंडे, ताफा रोखण्याचा केला प्रयत्न, पोलिसांना कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 02:58 PM2020-09-20T14:58:27+5:302020-09-20T14:58:53+5:30
या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विविध विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत.
नाशिक - शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी तसेच अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज नाशिक येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मोटर अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विविध विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आज नाशिकमध्ये गंगापूर स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी ते नाशिक मधून विद्यापीठाकडे जात असताना विद्यापीठाच्या मार्गावर अभाविपच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून मोटार अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दडपशाही करून कार्यकर्त्यांवर कारवाई केली असा आरोप अभाविपच्या वतीने अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी केला आहे.
दरम्यान, उदय सामंत यांनी या कृतीचा निषेध केला आहे वरिष्ठांच्या नजरेत आपण यावर आणि काहीतरी पद मिळावे यासाठी अभाविपच्या वतीने राज्यात सर्वत्र आपल्या दौऱ्यात अशीच आंदोलने करण्यात येत आहेत मात्र आपण दादागिरीला घाबरणार नाही, संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये असे आपले मत आहे त्यामुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते मात्र त्यांनी अशी दिखाऊ आंदोलन करू नये असा टोला सामंत यांनी लगावला आहे.