ए.सी. सरकार संघटनेचा आदिवासींसाठी लढा सुरुच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:15 PM2020-01-20T18:15:47+5:302020-01-20T18:16:25+5:30
मधुकर गावीत : कार्यकर्त्यांचा जनजागृती मेळावा
सटाणा : आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरु द्ध १९३० पासून अे.सी. कुँवर केसरी सिंह यांनी सुरू केलेले आंदोलन यापुढेही समाजाच्या न्याय हक्कासाठी सुरूच राहील, असे प्रतिपादन अे.सी. सरकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर गावीत यांनी बागलाण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना केले.
तालुक्यातील अजमेर सौंदाणे जवळील दुधमाळ वस्तीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करतांना गावीत म्हणाले, आजही आदिवासी समाजासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांचा फायदा होत नाही. यापुढे आदिवासी बांधवानी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामसभेस हजर राहून आपल्या मागण्यांचा ठराव करून घ्यावा. जंगलामध्ये तयार केलेली शेती त्यांच्या नावे करून त्याचा सातबारा उतारा तात्काळ तयार करून द्यावा. या जमीनीचा मूळ मालक आदिवासी असूनही त्याला शासनाच्या वन विभागाकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांनी जमिनीतील पिक पहाणीची नोंद संबंधीत विभागाकडून वेळोवेळी करून घेणे, आदिवासी बांधवांच्या बळकावलेल्या जमिनी परत घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी हा लढा असून यापुढे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी गुजरात राज्यातुन आलेल्या राजुभैय्या, जिल्हा अध्यक्ष म्हाळु पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सरचिटणीस संजय अभिमन दळवी, तालुका अध्यक्ष भरत बोरसे, शहर अध्यक्ष छोटू दळवी, उखा सोनवणे ,शिवदास जिभाऊ सोनवणे, सोमनाथ छगन गायकवाड, मगन दादा, हीरालाल गौजी, बाज्या डूल्या, शिड्या मांजा, हीलाबाई कोटया, राजा शिड्या, बारमल बोरसे, बापू रामदास जाधव, पांडू सोनवणे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.