ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:45 PM2020-12-16T17:45:45+5:302020-12-16T17:54:03+5:30

देवगाव : जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या; मात्र आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने हालचालींना वेग आला असून चर्चाही रंगू लागल्या आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया होती. यंदा सदर फॉर्म्युला बदलण्यात आला असून, आता ग्रामपंचायत सदस्यच सरपंच ठरविणार आहेत.

Accelerate the movement of Gram Panchayat elections in rural areas | ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालींना वेग

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालींना वेग

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी, पेगलवाडी आणि शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागातील गावगाडा हाकणारे सरपंचपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते. ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने ऐन थंडीत गावगाड्याचे वातावरण तापणार असून, निवडणुका रंगतदार होणार आहेत. गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद असलेल्या निवडणुकीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे थंडावलेल्या चर्चा आता चांगल्याच रंगू लागल्या आहेत. कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका अर्ध्यातच थांबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर ग्रामपंचायत व पंचायत विभागातील विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून प्रशासक नेमण्यात आले होते, ते आजतागायत कायम आहेत. मात्र, आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वांनाच निवडणुकीचे वेध लागले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम दुरुस्तीनुसार सरपंच निवड सदस्यांमधून होणार असल्याने त्यामुळे गावोगावी पॅनल टू पॅनल सामना रंगणार आहे. सत्तेत कोण जाणार आणि विरोधी बाकावर कोण बसणार याची चर्चा रंगू लागली आहे. प्रत्येक कार्यकर्ता नियोजन करीत उमेदवाराची चाचपणी करण्याच्या तयारीला लागला आहे. सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने सदस्यांचे भाव वाढणार असून त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. सरपंचाच्या दावेदारांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. इच्छुक उमेदवार तयार करणे, गाठीभेटी घेणे, पॅनल तयार करणे, तहसील किंवा तत्सम ठिकाणी जाऊन कागदपत्रांची जुळवाजुळव करणे या कामासाठी गावपुढाऱ्यांची तालुक्याच्या ठिकाणी वर्दळ वाढली असून हळूहळू ग्रामपंचायत निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Accelerate the movement of Gram Panchayat elections in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.