वटार परिसरात कांदा लागवडीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:51+5:302020-12-06T04:14:51+5:30
वटार : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा व अवकाळी पाऊस, वातावरणातील सततचे बदल अशा संकटांचा सामना करीत, कांदा ...
वटार : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा व अवकाळी पाऊस, वातावरणातील सततचे बदल अशा संकटांचा सामना करीत, कांदा लागवड सुरू केली आहे. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील वटार, चौंधाणे, वीरगाव, वनोली, डोंगरेज, कंधाणे, विंचुरे आदी गावांमध्ये कांदा लागवडीला जोर धरला आहे, बळीराजा शेतात राबताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात टाकलेली रोप ७० टक्क्यांपेक्षा जास्त खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात बियाणे टाकल्यामुळे यंदा लागवडी उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याचे मत शेतकरीवर्गातून व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यातील आदिवासी भागातील मजूर वर्ग ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेला असल्याने मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई निर्माण झाली असून, प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत आहेत. तेही रोजंदारीवर न येता कंत्राट पद्धतीने काम करीत असल्याचे चित्र आहे, तसेच मजुरीचे दरही वाढले आहेत. कांदा लागवडीसाठी २५० ते ३०० रुपये रोज असा दर झाला असून, बियाणे, खते आदीमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी व यंदा कांद्याला चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर पिकापेक्षा चार महिन्याच्या कांदा पिकाची लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपे, बियाणे मिळेल त्या भावाने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे. परंतु शेतकऱ्यांना अधून-मधून पडणाऱ्या ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात; त्याचबरोबर बाजार मिळतो की नाही या विचाराने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सध्या एक एकर लागवडीसाठी १३ ते १५ हजार रुपये मजूरवर्ग घेतात. एक एकरसाठी यंदा बियाणांचे बाजारभाव बघता एक लाख रुपयांच्या आसपास खर्च कांदा काढणीपर्यंत होणार आहे. एवढा खर्च करून पीक निघेल आणि बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळला आहे.
चौकट
१५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार कांदा लागवड
यंदा अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे ७० टक्के कांदा रोप खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी एक-दोन नाही चार-पाच वेळा कांद्याची बियाणे टाकली. दर आठवड्याला फवारणी केली तरीही रोप चांगले नसल्यामुळे कांदा लागवडीत घट होणार असून, सध्या कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव मिळत आहे. तरीही रोप मिळत नाहीत, आहे तेवढ्यात लागवड करत असून यंदा अजूनसुद्धा शेतकरी बियाणे टाकत आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रोपे टाकली जातात. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा लागवडी सुरूच राहतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
चौकट
बियाणांच्या भावामुळे उत्पादन खर्चात होणार दुप्पट वाढ
परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रोपवाटिकांचे नुकसान झाले. परिमाणी शेतकऱ्यांना चार ते पाच वेळेस रोपे टाकावी लागली. यामुळे बाजारात कांदा बियाणांचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, कधी एकले नाही अशा सामान्य कंपनीचेदेखील बियाणे बाजारात ५ ते ६ हजार रुपये प्रतिकिलोने शेतकऱ्यांनी खरेदी केल्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ होणार आहे.
कोट
मागील काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव विचारात घेता, शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. परतीच्या पावसामुळे रब्बी उन्हाळी कांदा लागवडीच्या रोपवाटिकावर विपरीत परिमाण झाल्याने कांदा बियाणांची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांकडील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता मागील वर्षाच्या तुलनेत कांदा लागवडीच्या क्षेत्रात फारसी घट होणार नाही. रोपे लावताना शेतकऱ्यांनी एम ४५, वीस ग्राम, बाविस्टीन १० ग्राम, क्लोरोपार्रिफॉस् २० मिलि. दहा लिटर पाण्यामध्ये पंधरा मिनिटं कांद्याची रोपे बुडून ठेवायची व वाळवून ती लागवड करायची हे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आव्हान आहे.
सुधाकर पवार तालुका कृषी अधिकरी, सटाणा
यंदा परतीच्या पावसामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच ५ ते ६ हजार रुपये किलो भावाने शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले त्याला दर आठवड्याला फवारणी त्यामुळे यंदा कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. पैसे देऊन मजूर मिळत नाही, मजुरीचे दामही दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे शेती कसने अवघड झाली आहे.
संतोष बागुल, युवा कांदा उत्पादक शेतकरी
===Photopath===
051220\05nsk_33_05122020_13.jpg
===Caption===
वटार येथे कांदा लागवड करताना मजुर