राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:38 PM2021-01-27T23:38:27+5:302021-01-28T00:41:37+5:30
सटाणा : शहराचे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक सुशोभीकरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवारी (दि. ३ फेब्रुवारी) सटाणा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे व अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांनी बुधवारी (दि.२७) देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर, स्मारक सुशोभीकरणाची जागा व कार्यक्रमाचे नियोजित ठिकाण चित्रा सिनेमाची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

जगात एकमेव महसूल अधिकाऱ्याचे मंदिर असलेल्या यशवंतराव महाराज यांचा सर्वांनाच अभिमान असून राज्यपाल कोशारी यांना यशवंतराव महाराज यांच्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी महाराजांबद्दल विस्तृत माहिती असणाऱ्या हिंदी भाषिकाची नेमणूक करण्याची सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना केली. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी नियोजित स्मारक परिसरात व जुन्या ऐतिहासिक इमारतीत असलेल्या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत स्वच्छतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले.
हा कार्यक्रम केवळ नगरपरिषदेपुरता सीमित नसून संभाव्य टीका-टिप्पणी टाळण्यासाठी कार्यक्रमाची कोनशीला व्यवस्थित तपासून घेण्याची सूचना करत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी मुख्याधिकारी डगळे व यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासमवेत अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत विजय भांगरे, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, नगरसेवक दीपक पाकळे, पालिकेचे जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस आदींसह नगरपरिषदेच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
भूमिपूजन नव्हे सुशोभीकरण
कार्यक्रमाचे नियोजित ठिकाण चित्रा सिनेमागृहाची पाहणी जिल्हाधिकारी मांढरे यांनी केली असता कार्यक्रमाच्या दिवशी या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पास देण्याच्या सूचना केल्या शिवाय खुर्च्यांचे नियोजन देखील काटेकोरपणे करून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जुन्या ऐतिहासिक इमारतीचेच सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला भूमिपूजन समारंभ हा ह्यशब्दह्ण न वापरता सुशोभीकरण समारंभ असे म्हणायला हवे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.