अनलॉकनंतर रखडलेल्या खरेदीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:31+5:302021-06-03T04:11:31+5:30
नाशिक : जिल्ह्यातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर बाजारपेठेत गर्दी झाल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. अनलॉकनंतर रखडलेली खरेदी करण्यासाठी ग्राहक ...
नाशिक : जिल्ह्यातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर बाजारपेठेत गर्दी झाल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. अनलॉकनंतर रखडलेली खरेदी करण्यासाठी ग्राहक घराबाहेर पडले असून सर्वसामान्यांपासून किरकोळ विक्रेते तसेच शेतकऱ्यांचीही खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मेनरोड तसेच रविवार कारंजा, बोहरपट्टी, सराफ बाजार, भांडी बाजार, भद्रकाली मार्केट, त्याचप्रमाणे शालिमार येथील बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग वाढली असल्याचे दिसून येते. शहराच्या लगत असलेल्या खेडेगावांतील किरकोळ विक्रेत्यांसाठी नाशिक ही प्रमुख होलसेल बाजारपेठ असल्याने गावखेड्यातील लोकांचीही खरेदीसाठी गर्दी होत आहे.
अनलॉकमुळे खरेदी रखडल्याने लहान-मोठ्या दुकानांमध्ये देखील गर्दी होत आहे. इलेक्ट्रीकल साहित्य, पूजा साहित्य, हार्डवेअर, कटलरी, कापड दुकाने, क्लिनिंग मटेरिअल, गॅरेजसाठी लागणारे साहित्य, ग्रीन मॅट, मेणकापड, ताडपत्री खरेदीला प्राधान्य देण्यात आले आहे. चप्पल, बुटाच्या दुकानांपासून ते मोबाईल ॲक्सेसरीजच्या दुकानांमध्ये देखील ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. इतकेच नव्हे, तर सायकल, गॅस शेगडी रिपेअरिंगकरिता देखील लोक घराबाहेर पडले आहेत.
व्यवहाराला चालना मिळाल्यामुळे दुकानदारांनी समाधान व्यक्त केले असून गेल्या दोन दिवसात बाजारात चैतन्य असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दुकानांची वेळमर्यादा दुपारी २ वाजेपर्यंतच असल्यामुळे ग्राहकांकडून गर्दी केली जात असली तरी, दुकानदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी खबरदारी घेतली असल्याचे दिसून येते. सॅनिटायझर, डिस्टन्स पाळणे तसेच मास्क लावण्याचा आग्रह धरला जात आहे.
सराफ बाजारात देखील खरेदीचा उत्साह असल्याचे दिसून आले. गेल्या अनेक दिवसांपासून दुकाने बंद असल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला असला तरी, अनलॉकनंतर व्यवहाराला चालना मिळाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
--इन्फो--
प्रधान पार्कमधील मोबाईल दुकानांमध्ये गर्दी
एम. जी. रोडवरील प्रधान पार्क येथे असलेल्या मोबाईल ॲक्सेसरीज दुकानांमध्ये बुधवारी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याने अरुंद असलेल्या या मार्केटमध्ये उभे राहण्यासही जागा नव्हती. ग्राहकांनी रस्त्यावर वाहने उभी केल्याने एम. जी. रोडवर अन्य वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या मार्गावर मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. पोलिसांनी येथील वाहतूक नियंत्रित केली, तर जिल्हा प्रशासनाने प्रधान पार्कमधील मोबाईल मार्केट बंद करण्याची कार्यवाही केली. रस्त्यावरील अन्य मोबाईलच्या दुकानांमधील गर्दी मात्र कायम होती.
--कोट--
गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण सराफी व्यवसाय बंद होता. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार व कोविड नियमांचे पालन करून सराफ बाजारातील दुकाने निर्धारित वेळेत सुरू करण्यात आली आहेत. दोन महिन्यांनंतर ग्राहकांनी सुद्धा आपल्या पारंपरिक सराफाकडे सोने, चांदी खरेदीला प्राधान्य दिले. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागतच आहे.
- गिरीश नवसे, अध्यक्ष, दि नाशिक सराफ असोसिएशन