जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 07:47 PM2019-12-25T19:47:05+5:302019-12-25T19:49:37+5:30
जिल्हा परिषदेतील सदस्य संख्येवरच अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे वाटप केले जाणार आहे. मात्र कोणत्या पक्षाला कोणत्या विषय समित्या देण्यात येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेनेत अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना इच्छुकांच्या हालचालींनी वेग घेतला असून, त्यासाठी नाशिक भेटीवर आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी-गाठी घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्र राहणार असल्याचे जाहीर केल्यामुळे भाजपचे मनसुबे उधळले गेले आहेत, तर कॉँग्रेसमध्ये सभापतिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेतील सदस्य संख्येवरच अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे वाटप केले जाणार आहे. मात्र कोणत्या पक्षाला कोणत्या विषय समित्या देण्यात येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेनेत अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात असून, नाशिक भेटीवर आलेले खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेकडे सा-यांचे लक्ष आहे. सेनेत बाळासाहेब क्षीरसागर, रमेश बोरसे, उषा दराडे, भास्कर गावित यांच्या नावांची चर्चा असली तरी, विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे ह्यादेखील उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आणखी मिळाल्यास काम करण्यास तयार आहेत. इच्छुकांनी आपापल्यापरिने मातोश्रीपर्यंत आपली इच्छा पोहोचविली असून, त्यात कोण यशस्वी होतो हे महत्त्वाचे आहे. तर राष्टÑवादीनेदेखील अध्यक्षपद मिळाल्यास बरे होईल, अशी भावना यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यासाठी यतिन पगार यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी, सदस्य संख्येचा विचार करता, राष्टÑवादीला अध्यक्षपद मिळणे कठीण आहे. उपाध्यक्षपदासाठी संजय बनकर, महेंद्रकुमार काले, उदय जाधव यांच्या नावांची चर्चा होत असून, ज्यांना यापूर्वी पदे मिळाली त्यांच्या ऐवजी अन्य सदस्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. कॉँग्रेसच्या वाट्याला सभापतिपद मिळू शकते. आठ सदस्यांच्या संख्येचा विचार करता एक सभापतिपद देण्यात येईल, परंतु त्यासाठी जवळपास सर्वांनीच इच्छा प्रदर्शित केली आहे. अश्विनी आहेर, यशवंत गवळी यांची नावे घेतली जात असून, त्यातही समाजकल्याण सभापतिपद पक्षाकडे राहिल्यास यशवंत गवळी यांची वर्णी लागू शकते. गवळी हे गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे याबाबत अंतिम निर्णय घेतील.