निर्यातक्षम द्राक्षांमध्ये तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:51 PM2020-01-25T22:51:49+5:302020-01-26T00:15:32+5:30
जानेवारी महिन्यात द्राक्ष हंगामाला दमदार सुरुवात झाली असून, स्थानिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या द्राक्षापेक्षा निर्यातक्षम द्राक्षांना तेजी आहे, तर स्थानिक पातळीवर विकल्या जाणाºया द्राक्षांना कवडीमोल दर मिळत आहे.
बाजीराव कमानकर
सायखेडा : जानेवारी महिन्यात द्राक्ष हंगामाला दमदार सुरुवात झाली असून, स्थानिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या द्राक्षापेक्षा निर्यातक्षम द्राक्षांना तेजी आहे, तर स्थानिक पातळीवर विकल्या जाणाºया द्राक्षांना कवडीमोल दर मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक द्राक्ष युरोपच्या बाजारात विक्र ीसाठी जातात. त्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. त्या तुलनेत राज्याच्या द्राक्ष शिवारात संथ हालचाली आहेत. निर्यातक्षम द्राक्षांची ९० ते १२० रु . प्रतिकिलोने खरेदी सुरू आहे, तर स्थानिक पातळीवर अवघे २० ते ४० रूपये दराने विकली जात आहेत.
यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. कूज आणि डावणी, भुरी नियंत्रणासाठी कसरत करूनही ४० टक्के बागा गेल्या. त्यामुळे यंदा द्राक्ष चांगला भाव खातील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्याचप्रमाणे निर्यातक्षम द्राक्ष चांगला दर मिळवत असून, स्थानिक पातळीवर मिळत असलेल्या दराने खर्चदेखील फिटत नसल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. देशात द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर असून, नाशिकच्या द्राक्षांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. येथील काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, योग्य हवामान, बाजारपेठेची सुविधा यामुळे द्राक्ष लागवडीची संख्या मोठी आहे.
रशिया, मलेशियात सर्वाधिक निर्यात
जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, सटाणा, बागलाण, नाशिक, सिन्नर तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची शेती केली जाते. अनेक शेतकरी आपल्या शेतात बागा लावून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष पिकवितात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातून भारतातील पहिला कंटेनर विदेशात रवाना होतो. निर्यातक्षम द्राक्षातून शेतकºयांना चार पैसे अधिक मिळतात. लोकल बाजारात मात्र कवडीमोल दरात विक्र ी करावी लागते. रशिया मलेशिया, चीन, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांत सर्वाधिक माल निर्यात केला जातो. स्थानिक देशात उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आदी भागात नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष जातात. मागील आठवड्यात उत्तर भारतात मोठी थंडी पडल्यामुळे बाजारभाव घसरले आहे. द्राक्षांचा उठाव कमी झाला आहे. थंडी कमी झाली की फेब्रुवारी महिन्यात द्राक्षाचे स्थानिक पातळीवर दर वाढण्याची शक्यता आहे.
खर्चात दहा टक्के वाढ; दरात फरक
निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्यासाठी येणारा खर्च हा लोकलपेक्षा केवळ दहा टक्के जास्त येतो, तर दरात मात्र मोठी तफावत असते. केवळ पेपर लावणे, मजुरी, औषधे यांचा खर्च काही प्रमाणात वाढतो. मात्र दर कैकपटीने अधिक मिळतो.
यंदा प्रथमच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष पिकविण्यास मोठा खर्च आला. एकरी किमान पन्नास हजार रु पये खर्च वाढला आणि खर्च करूनही बाग हातातून गेली आहे. ज्या आहे त्यांना स्थानिक पातळीवर बाजारात चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. -रामदास शिंदे, द्राक्ष बागायतदार