शेतकऱ्यांकडून लाचलुचपत पेचात
By admin | Published: March 25, 2017 01:14 AM2017-03-25T01:14:13+5:302017-03-25T01:14:38+5:30
नाशिक : नांदगावच्या कथित जमीन घोटाळ्यानंतर बागलाणच्या जमीनमालकांच्या आड महसूल खात्यावर कुरघोडी करू पहात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला बागलाणच्या जमीन मालक शेतकऱ्यांनी चांगलेच अडचणीत आणले
नाशिक : नांदगावच्या कथित जमीन घोटाळ्यानंतर बागलाणच्या जमीनमालकांच्या आड महसूल खात्यावर कुरघोडी करू पहात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला बागलाणच्या जमीन मालक शेतकऱ्यांनी चांगलेच अडचणीत आणले असून, मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी बेकायदेशीरपणे जमिनी शासनजमा करून पैशांच्या लाभासाठी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. शुक्रवारी बागलाणच्या जागा मालक पंचवीस शेतकऱ्यांनी नाशिकला धाव घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या उपअधीक्षकांची भेट घेऊन संयुक्त निवेदन सादर केले आहे. नांदगावच्या कथित जमीन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्या इशाऱ्यावरून गुन्हा दाखल केल्याचा उघड आरोप महसूल खात्याकडून करण्यात येत असताना, लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानेही या आरोपाला पुष्टी देणारी पावले उचलली होती. नांदगावप्रमाणेच कळवण, सुरगाणा व बागलाण या तीन तालुक्यांतही नवीन शर्तींच्या व इनाम जमिनींच्या व्यवहारात अनियमितता झाल्याची माहिती पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिली, परिणामी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळवण, सुरगाणा व बागलाण या तीन तालुक्यांतील जमिनींच्या व्यवहारांची माहिती मागविली होती. ही माहिती मागविताना महसूल खात्याला अडचणीत आणण्याचाच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा मनसुबा होता. तथापि, बागलाण तालुक्यातील भिल्ल व इनाम वतनाच्या जमिनींबाबतही रामचंद्र पवार यांनी चुकीची कारवाई करून जवळपास पंचवीस शेतकऱ्यांच्या जमिनी शासन जमा केल्या होत्या. पवार यांच्या कारवाईविरोधात बागलाणच्या शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता, विभागीय आयुक्तांनी पवार यांची कृती बेकायदेशीर ठरवित जागा मालकांच्या बाजूने निर्णय दिला. नेमका त्याचाच आधार घेत बागलाणच्या जागा मालक शेतकऱ्यांनी एकत्र येत शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला धडक दिली. रामचंद्र पवार यांनी इनाम वतनाच्या जमिनींबाबत पैशाचा हेतू ठेवून आमच्या जमिनी बेकायदेशीरपणे शासन जमा करून पदाचा गैरवापर केला आहे. त्यांची ही कृती लोकसेवक पदाचे गुन्हेगारी वर्तन असून, अशाच प्रकारात नांदगावच्या जमिनी शासन जमा करून पवार यांनी जमीन मालकाकडून लाचेची मागणी केली होती. त्यामुळे बागलाणच्या जमिनी सरकार जमा करण्यामागे त्यांचा हाच हेतू असल्याचे स्पष्ट झाल्याने पवार यांच्या विरोधात लाचलुचपत कायद्यान्वये तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर जगदीश पाटील, दाजी काकुळते, सोमनाथ सूर्यवंशी, समाधान अहिरे, शांताराम काकुळते, प्रशांत अहिरे, दोधा गोयकर, सयाजी कुलाल, बंडू बिचकुले, अनिल बेडीस, बापू सावकार, भाऊसाहेब बच्छाव, दशरथ बच्छाव, विजय देसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)