स्वीकृत’ सदस्यत्वासाठी लागेना मुहूर्त
By admin | Published: May 8, 2017 06:11 PM2017-05-08T18:11:57+5:302017-05-08T18:11:57+5:30
महापालिका : सत्ताधाऱ्यांकडून सावध भूमिका
ााशिक : महापौर-उपमहापौरपदाच्या निवडीनंतर महिनाभरात स्वीकृत सदस्यांचीही निवड होणे अपेक्षित असते. परंतु, दीड महिन्यानंतरही स्वीकृत सदस्य निवडीसाठी मुहूर्त लाभू शकलेला नाही. सत्ताधारी भाजपाकडूनही त्याबाबत सावध भूमिका घेतली जात असून, भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या तीन जागांकरिता स्पर्धक जास्त असल्याने पेच वाढल्याचे सांगितले जात आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ६६ सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य नियुक्त करायचे आहेत. सद्यस्थितीतील तौलनिक संख्याबळानुसार २४.४० चा कोटा आहे. त्यानुसार, भाजपाचे ३ आणि शिवसेनेचे २ सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त होऊ शकतात. कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेला संधी नाही. स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त होण्यासाठी भाजपा व सेना या दोन्ही पक्षांत इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे. त्यातल्या त्यात भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाकडून अद्याप स्वीकृत सदस्यत्वाबाबत एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे नियुक्तीप्रक्रियाही लांबत चालली आहे. नियमानुसार, स्वीकृत सदस्यांचाही कालावधी पाच वर्षांसाठी असतो. परंतु, त्यातही एकेक वर्षासाठी स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देता येईल काय, याची चाचपणी भाजपाकडून सुरू असल्याचे समजते. याशिवाय, शासनस्तरावरून स्वीकृतची संख्या वाढविली जाणार असल्याची चर्चा असल्याने भाजपाने सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.