विखरणीसह परिसरात अक्षय प्रकाश योजनेला मंजुरी
By admin | Published: March 20, 2017 11:56 PM2017-03-20T23:56:27+5:302017-03-20T23:56:43+5:30
शैलेश कुमार : महिन्याभरात लेखी निविदा काढण्याचे आश्वासन ; परिसरातील शेतकऱ्यांना होणार फायदा
येवला : तालुक्यातील विखरणी उपकेंद्रातून त्वरित संबंधित सर्व गावांना अक्षय प्रकाश योजना सुरू करण्यात येणार असून, एक महिन्याच्या आत निविदा काढण्याचे लेखी आश्वासन विद्युत वितरण कंपनी मनमाड विभागाचे उपविभागीय अभियंता शैलेश कुमार यांनी दिले.
याबाबत ‘लोकमत’ने दि. ९ मार्चच्या अंकात ‘अक्षय प्रकाश योजनेची मागणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची वीज वितरण कंपनीकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली. अक्षय प्रकाश योजनेसाठी येवला-मनमाड महामार्गावरील विसापूर फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला होता. मात्र यासंदर्भात मनमाड उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत एक महिन्याचा आत निविदा काढण्याचे लेखी आश्वासन मनमाड विभागाचे उपविभागीय अभियंता शैलेश कुमार यांच्याकडून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
एक महिन्यात यावर कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेण्याची भूमिका मोहन शेलार, नामदेव पगार, अशोक कोताडे, अशोक बंदरे, बाळासाहेब उशीर यांचेसह शेतकऱ्यांनी स्पष्ट केली आहे. (वार्ताहर)