सर्वच पक्षांकडून स्वीकृत नगरसेवकपदाचे गाजर
By Admin | Published: May 12, 2017 11:43 PM2017-05-12T23:43:55+5:302017-05-12T23:44:17+5:30
संगमेश्वर : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेना व भाजपात वाढलेल्या इच्छुकांच्या नाराजीला आवर घालण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले.
राजीव वडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमेश्वर : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेना व भाजपात वाढलेल्या इच्छुकांच्या नाराजीला आवर घालण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांपासून अन्य अनेक पदांचे आमिष देण्यात आले. तथापि, नाराजी कमी झाली नाही. उलट महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस असली तरी पश्चिम भागात भाजपा आणि शिवसेना, तर पूर्व भागात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी संख्या होती. शेकडो अर्ज दाखल झाले होते. त्यानुसार उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तथापि, सर्वच पक्षांकडे इच्छुकांची दावेदारी इतकी प्रबळ होेती की, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यांच्या, समाजाच्या माध्यमातून दबाव आणत होता. अखेरीस अशा नाराजांना स्वीकृतचा शब्द देण्यात आला आहे. नेत्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी केवळ नेत्यांचा शब्द म्हणून अनेकांनी दावेदारी मागे घेतली आणि पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून देण्याची तयारी दर्शविली. अशा प्रकारे वेगवेगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदाचा शब्द दिला आहे. महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकाच्या केवळ चार जागा आहेत. कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात, त्यांच्या संख्येच्या तुलनेत तौलनिक संख्याबळ ठरते आणि त्यानुसार त्या पक्षाच्या वाटेला किती स्वीकृत सदस्यपदासाठी जागा येतात हे अजुन स्पष्ट नसताना शेकडो इच्छुकांना शब्द देण्यात आले असून, हुरळून गेलेले इच्छुक आता महानगरपालिका निवडणूक पार पडण्याची वाट पाहत आहेत. मावळत्या महापालिकेत सखाराम घोडके, संजय दुसाने (शिवसेना), अॅड. हिदायतुल्ला अन्सारी (कॉँग्रेस), रहेमान शहा (कॉँग्रेस) हे स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत होते.