अंजनेरी गडावर प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:14 AM2021-04-27T04:14:47+5:302021-04-27T04:14:47+5:30
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक पश्चिम वनविभागाच्या वतीने त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गडावर भाविकांना अथवा पर्यटकांना प्रवेश ...
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक पश्चिम वनविभागाच्या वतीने त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गडावर भाविकांना अथवा पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. शासनाच्या आदेशानुसार हनुमान जन्मोत्सव देखील सार्वजनिक स्वरूपात गडाच्या पायथ्याशी होणार नसल्याने भाविक पर्यटकांनी याठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून मान्यता असलेल्या अंजनेरी गडावर दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरते; मात्र यावर्षी कोरोनाच्या साथीने सर्व राज्यभरात आणि जिल्ह्यात थैमान घातल्याने सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सोहळे, सण, उत्सव रद्द करण्याचे तसेच धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. हे आदेश जिल्ह्यात सुद्धा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जसेच्या तसे लागू केले आहेत. त्यामुळे यंदा हनुमान जयंती निमित्ताने अंजनेरी गडावर यात्रा भरणार नाही, असे अंजनेरी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच अंजनेरी गडाच्या वाटा देखील वनविभागाकडून बंद करण्यात आल्या आहेत. शासकीय आदेशाचे पालन करत अंजनेरी गडावर कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही, याची सर्वोतोपरी खबरदारी वनविभागाकडून घेतली जात असून त्र्यंबकेश्वर पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले आहे. अंजनेरी गडाच्या पायथ्याला तसेच गडमाथ्यावर वनविभागाचा तसेच त्र्यंबक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी अंजनेरी गडावर येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नाशिक, त्र्यंबकेश्वरचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी केले आहे.