द्वारकावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:55 PM2020-01-29T22:55:52+5:302020-01-30T00:11:34+5:30
द्वारकेवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महामार्गावरून बाजार समितीकडे जाणारी अवजड वाहने टाकळीमार्गे वळविण्यात येत असल्याची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार जारी करण्यात आली आहे.
नाशिक : द्वारकेवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महामार्गावरून बाजार समितीकडे जाणारी अवजड वाहने टाकळीमार्गे वळविण्यात येत असल्याची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार जारी करण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न होत असून, त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून उड्डाणपूल तसेच पादचारी मार्गही करण्यात आला. मात्र तरीदेखील येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटली नाही. पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार या ठिकाणी महामार्गासह एकूण १७ रस्ते एकत्र येतात. तसेच अवजड वाहनांच्या वाहतूक यामुळे वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. तसेच या परिसरात शैक्षणिक संस्थांसह इतर कार्यालये असल्याने सकाळी व सायंकाळी गर्दी असते.
वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अधिसूचना काढून नाशिक दिंडोरीरोड, पंचवटी व पेठरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगमनेर, सिन्नर, नाशिकरोड या भागांकडून वाहतूक करणाऱ्या मालवाहतुकीच्या व भाजीपाल्याच्या वाहनांना तसचे सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना द्वारकामार्गे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून नाशिक पुणेरोड येथून फेम सिग्नल चौफुलीमार्गे टाकळीरोड, संत
जनार्दन स्वामी पूल, तपोवन, संत औरंगाबादरोडवरून रासबिहारी हायस्कूल, मेरी कार्यालय, दिंडोरीरोडमार्गे पंचवटी, पेठरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत जातील व याच मार्गाने पुन्हा पुणे महामार्गावर येतील.
वाहतूक विभागाकडून दररोज द्वारका सर्कल येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात अधिसूचना काढून द्वारका सर्कल येथे नाशिक महानगरपालिकेकडून अद्ययावत सिग्नल यंत्रणा मंजूर करून सुरू करण्यात येणार आहे. सर्व्हिसरोडवरील वाहतूक वळविणे, बसथांबे हलविणे, एकेरी वाहतूक करणे, अवजड वाहनांनी उड्डाणपुलाचा वापर करावा यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.