गणेशपेठेत वाहनांना प्रवेशबंदी : वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सहा एकेरी मार्ग प्रस्तावित सिन्नर शहराचा प्रारूप वाहतूक आराखडा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:09 AM2018-02-09T01:09:52+5:302018-02-09T01:10:16+5:30
सिन्नर : शहरातील नित्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नगर परिषदेने प्रारूप वाहतूक आराखड्याला मंजुरी दिली आहे.
सिन्नर : शहरातील नित्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नगर परिषदेने प्रारूप वाहतूक आराखड्याला मंजुरी दिली आहे. मुख्य बाजारपेठ वाहन मुक्त करण्यासह सहा रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचा मार्ग या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे.
बसस्थानकाला जोडणाºया प्रमुख मार्गासह शहरातील वर्दळीचे सहा रस्ते एकेरी वाहतुकीचे होणार आहेत. प्रवेशासाठी व शहराबाहेर पडण्यासाठी दोन मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यासह चौदा वाड्यांसह आणखी दोन ठिकाणी पार्किंग झोन उभारणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेशपेठेत वाहनांना प्रवेशबंदी करण्याचेही आराखड्यात समाविष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात वाहतूक कोंडीची समस्या आहे. ती दूर करण्यासाठी प्रारूप वाहतूक आराखड्याला नगर परिषदेच्या मासिक आढावा बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, रुपेश मुठे, गोविंद लोखंडे, बाळासाहेब उगले, शैलेश नाईक, विजय जाधव, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास आदी उपस्थित होते. नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता जनार्दन फुलारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. मिळकत व्यवस्थापक नीलेश बाविस्कर, स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड यांचा यात समावेश आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेश पेठेतील नागरिकांना होणारी अडचण विचारात घेता नवापूल ते गणेशपेठ मार्गे शिवाजी चौकापर्यंतच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्याचे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रारूप आराखड्याबाबत दोन महिन्याच्या आत नागिरकांना आराखड्यावर हरकती नोंदविता येणार आहेत.