ग्रामीण भागात हात धुवूनच गावात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:51 PM2020-03-30T16:51:14+5:302020-03-30T16:54:55+5:30
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विशेष दक्षता घेण्यात येत असून, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशनची फवारणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विशेष दक्षता घेण्यात येत असून, सोशल डिस्टन्सिंग, फवारणी, दवंडी आदी माध्यमातून ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विशेष दक्षता घेण्यात येत असून, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशनची फवारणी करण्यात येत आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये शेतकऱ्यांनी यासाठी विनामोबदला ट्रॅक्टरदेखील उपलब्ध करून दिले आहेत. ग्रामस्थ व ग्रामपंचायतींच्या सहकार्याने ग्रामीण भागात ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हात धुण्याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन हात धुण्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देत आहेत. कळवण तालुक्यातील कुंडाणे तसेच पेठ तालुक्यातील ससने ग्रामपंचायतीमध्ये तर हात धुवूनच ग्रामस्थांना गावात प्रवेश देण्यात येत आहे. कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत असून, ग्रामीण भागातील किराणा दुकान तसेच मेडिकल दुकान, भाजीबाजार येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी जागेची आखणी करून देण्यात येत आहे. या आखणी केलेल्या जागेतूनच ग्रामस्थांना वस्तू देण्यात येत आहेत.
कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध प्रयत्न सुरू असताना तोंडावर लावण्यासाठी मास्क अत्यावश्यक असल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक महिला बचतगटांमार्फत मास्क बनविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने गावोगावी दंवडीद्वारे जनजागृती करण्यात येत असून, संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. दरम्यान, अधिकारी तसेच कर्मचारी यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले असून, आरोग्य व पाणीपुरवठा विभागाची कार्यालये सुरू ठेवण्यात आलेली आहेत.