कसारा घाटातील दरीत कंटेनर कोसळून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 10:59 PM2022-02-05T22:59:38+5:302022-02-05T23:01:01+5:30
इगतपुरी : मुंबई- नाशिक महामार्गावर शुक्रवारी (दि. ४) जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना वाहनावरील ताबा सुटल्याने कोळशाने भरलेला कंटेनर (एमएच १५ - ईव्ही ९८२६) हा संरक्षक कठडे तोडून दोनशे ते अडीचशे फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालकाने वाहनातून उडी मारल्याने तो बचावला असून, कंटेनरचा मात्र पूर्ण चक्काचूर झाला आहे.
इगतपुरी : मुंबई- नाशिक महामार्गावर शुक्रवारी (दि. ४) जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना वाहनावरील ताबा सुटल्याने कोळशाने भरलेला कंटेनर (एमएच १५ - ईव्ही ९८२६) हा संरक्षक कठडे तोडून दोनशे ते अडीचशे फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालकाने वाहनातून उडी मारल्याने तो बचावला असून, कंटेनरचा मात्र पूर्ण चक्काचूर झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि. ४) सकाळी मुंबईहून नाशिककडे जात असता कंटेनर चालक अनिल श्रीकृष्ण रोडे (रा. बीड) हा कसारा घाट चढत असताना हिवाळा ब्रीजच्या अलीकडील वळणावर एका अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करते वेळी हूल दिल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला व कोळशाने अर्धवट भरलेला कंटेनर थेट दरीत कोसळला. या दरम्यान वाहनचालक अनिल रोडे यांनी प्रसंगावधान राखत गाडीतून उडी घेत आपला बचाव केला. पण कंटेनर थेट दरीत जाऊन रेल्वे बोगद्याच्या कठड्याला अडकला. या दरम्यान कंटेनरचा पूर्ण चेंदामेंदा झाला. कंटेनर दरीत गेल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, कसारा पोलीस, टोल यंत्रणा १०३३ च्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरीत उतरले आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य....
खोल दरीत गेलेल्या कंटेनरमध्ये कोणी अडकलय का? मोठी हानी आहे का? हे बघण्यासाठी व अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीमचे श्याम धुमाळ, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आयरे, स्वप्नील, बाळू मांगे, महामार्ग पोलीस कर्मचारी विटकर हे २५० फूट खोल दरीत उतरले होते.
अपघात ग्रस्त ट्रक व परिसरात शोध घेतल्यावर कोणत्याही प्रकारे जखमी आढळले नाही. कंटेनरचा चालक सुखरूप असल्याने त्याला कसारा पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, खोल दरीत उतरून मदत कार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन टीमचे पोलीस प्रशासनाने आभार व्यक्त केले.
मोठा अनर्थ टळला...
कंटेनरचा अपघात भीषण होता. कसारा घाटाच्या खाली ३०० फूट खोल दरी लगत रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गांवरून नाशिक-मुबई रेल्वे सेवा सुरू असते. शुक्रवारी (दि. ४) सकाळी जो कंटेनर दरीत कोसळला, तो मोठ्या वेगात खाली दरीत कोसळला होता. दरीत कोसळलेला कंटेनर रेल्वे ट्रॅक मार्गांवर असलेल्या बोगद्याच्या दगडी भिंतीवर अडकला म्हणून पुढील अनर्थ टळला.
अपघात झाल्यावर १० मिनिटांनी या रेल्वे ट्रकवरून मुंबईकडे मेल एक्सप्रेस रवाना झाली. जर मेल एक्सप्रेस व अपघाताच्या वेळी आली असती तर रेल्वेच्या कम्पनामुळे कंटेनर थेट रेल्वेवर सुद्धा कोसळला असता व मोठी हानी झाली असती. दरम्यान, याप्रकरणी कसारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.