वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघात नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:17 AM2021-01-19T04:17:23+5:302021-01-19T04:17:23+5:30
नाशिक : वाहतूक नियमांचे पालन करूनच रस्त्यावर वाहने चालविणे अपेक्षित आहे. मात्र, नियमांचा भंग करणाऱ्या चालकांमुळे स्वत: चालक आणि ...
नाशिक : वाहतूक नियमांचे पालन करूनच रस्त्यावर वाहने चालविणे अपेक्षित आहे. मात्र, नियमांचा भंग करणाऱ्या चालकांमुळे स्वत: चालक आणि इतरांचाही जीव धोक्यात येतो. त्यामुळे चालकाने सर्वप्रथम वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीची मदतदेखील केली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, आमदार नरेंद्र दराडे, सरोज अहिरे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ यांनी, रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही वाहतूक नियमावलींची प्रचार व प्रसिद्धी करावी आणि लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत प्रादेशिक परिवहन विभागातर्फे मार्गदर्शक पुस्तिका, दूरचित्रवाणी, रेडिओ, पथनाट्य याद्वारे जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत.
प्रादेशिक परिवहन विभागामार्फत तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असल्याने ही पुस्तिका सर्वांपर्यंत पोहोचविण्यात यावी. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या अभियानात विद्यार्थ्यांना देखील विविध उपक्रमांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेविषयीची माहिती वेळोवेळी देण्यात यावी. त्याचप्रमाणे ट्रक, ट्रेलर अशा मोठ्या स्वरूपाच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन परवाना दिल्यानंतर दर तीन ते चार वर्षांनी या वाहनचालकांचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची अंमलबजावणी होऊन रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गाड्यांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच सामाजिक जाणीवेचे भान ठेवून अपघातग्रस्त व्यक्तींना वेळेत मदत करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यात यावे आणि शासनपातळीवर कार्यरत असणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी अधिक कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले. येवला येथे तयार करण्यात आलेला ट्राफीक पार्क प्रादेशिक परिवहन विभागाने ताब्यात घेऊन जनसामान्यांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करावी अशी सूचनाही त्यांनी केली.
प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक यांनी तयार केलेल्या ‘रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका’ पुस्तिका व रस्ता सुरक्षेबाबतच्या माहितीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आयुक्त कैलास जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी रस्ता सुरक्षा प्रबोधनपर मनोगत व्यक्त केले.
(फोटो:आर:१८भुजबळ) कॅप्शन: रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर , पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय आदी.