पाथर्डी-वडनेर रस्त्यावर दुभाजकांअभावी अपघात
By admin | Published: October 19, 2015 10:30 PM2015-10-19T22:30:01+5:302015-10-19T22:31:20+5:30
पाथर्डी-वडनेर रस्त्यावर दुभाजकांअभावी अपघात
पाथर्डी फाटा : पाथर्डी फाटा ते वडनेरगेट दरम्यानच्या रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आले असले तरी, या रस्त्यावर दुभाजक न टाकल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
रस्ता मोठा होऊनही अपघातांचा धोका कमी न झाल्याने येथून जाताना वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
पाथर्डी फाटा येथून वडनेर गेट, देवळाली कॅम्प, नाशिकरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या पाच-सहा वर्षांत प्रचंड रहदारी वाढली आहे. मुंबईकडून-पुण्याकडे आणि सिडको सातपूरकडून नाशिकरोडकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व दुभाजक टाकावे, अशी मागणी परिसरातील नागरिक सातत्याने करीत असून दुभाजक न टाकल्याने अपघातांचा धोका कमी होण्याऐवजी वाढला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हा रस्ता रुंद करताना चौपदरी वाटावा एवढा मोठा झाला. असे असूनही त्याला दुभाजक न टाकल्याने वाहने समोरासमोर येऊन ओव्हरटेक करताना अपघातांची शक्यता वाढली आहे. रस्ता चांगला झाल्याने वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवू लागली आहेत. या रस्त्याला अपघाती वळण आहेत. परिणामी अपघात टाळण्यासाठी दुभाजक टाकणे अत्यावश्यकच होते. मात्र त्याकडे संबंधितांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहे. रस्त्यावर तातडीने दुभाजक टाकावेत, अशी मागणी बी. व्ही. गायकवाड, कमल अग्रवाल, सागर देवरे, भाऊसाहेब पाटील, विजय सोनवणे आदिंसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)