भीषण अपघात! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीचा डम्परखाली चिरडून अंत, काळाने घातला घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:50 PM2022-02-18T12:50:17+5:302022-02-18T12:59:30+5:30
नाशिकरोड - मखमलाबाद येथून नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून दुचाकीने घराकडे परतत असताना नाशिकरोड दत्त मंदिर चौकात डम्परखाली सापडून पती-पत्नीचा जागीच ...
नाशिकरोड - मखमलाबाद येथून नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून दुचाकीने घराकडे परतत असताना नाशिकरोड दत्त मंदिर चौकात डम्परखाली सापडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की घटना पाहणाऱ्या अनेकांना भोवळ आली, तर रस्त्यावर रक्तामांसाचा पडलेला सडा पडला होता. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे चेहडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
चेहेडी नाका साई विहार अपार्टमेंटमध्ये राहणारे विठ्ठल दादा घुगे (४९) व त्यांची पत्नी सुनीता घुगे (४७) हे बुधवारी (दि.१६) मखमलाबाद येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून घुगे दाम्पत्य हिरो होंडा (एमएच/१५/ ईव्ही/१८६७) दुचाकीवरून नाशिक-पुणे महामार्गाने चेहडीला घरी जात होते. दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास दत्त मंदिर सिग्नल जवळील हॉटेल सदगुरु समोर येताच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघेही डम्परच्या चाकाखाली सापडून चिरडल्या गेले. अपघातात क्षणार्धात पती-पत्नीचा जागीच अंत झाला, तर अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा व हाडामांसाचा सडा पडलेला होता.
अपघातानंतर डम्परचालक उड्डाणपुलावरून पळून गेला. याप्रकरणी राजेंद्र दादा घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विठ्ठल घुगे हे एका मोठ्या खासगी हॉटेलमध्ये कामास होते. त्यांच्या पश्चात स्नेहल (२१), श्रावणी (१६) या दोन मुली आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, दुय्यम पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी पाण्याचा टँकर बोलवून पाण्याने रस्ता धुण्यात आला.
पाणी तापवून ठेवा!
मखमलाबाद येथील अंत्यविधी आटोपल्यानंतर विठ्ठल घुगे यांनी मोबाईलवरून घरी फोन करून पाणी तापवून ठेवा, असा शेवटचा फोन केला होता. मात्र त्यानंतर काही वेळातच काळाने घुगे दाम्पत्यावर झडप घातली. या दाम्पत्याला दोन मुली असून, या घटनेने या दोघींवरील मायेचे छत्र हरपले आहे. त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून, त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. आई, पप्पांच्या नावाने टाहो फोडणाऱ्या या मुलींचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही हृदय पिळवटून निघत आहे.