मंचर शिवारात अपघात; जिल्ह्यातील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:44 AM2018-03-05T01:44:13+5:302018-03-05T01:44:13+5:30
दिंडोरी : नाशिक-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संघटक रमेश सोनवणे यांच्यासह त्यांचे जावई व बबन तिडके ठार झाले.
दिंडोरी : नाशिक-पुणे महामार्गावर मंचर शिवारात झालेल्या कार अपघातात खेडगाव येथील शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संघटक रमेश सोनवणे यांच्यासह त्यांचे जावई व पोलीस हवालदार बबन तिडके ठार झाले असून, दोन जण जखमी झाले आहेत. पुणे येथे भाचीला आणण्यासाठी ते गेले होते. तेथील कामे उरकून आय२० कार (क्र मांक एमएच १५ ५१५१) मधून रमेश नामदेव सोनवणे (५८) हे त्यांचे नातेवाईक पोलीस कर्मचारी बबन निवृत्ती तिडके (५२) राहणार कसबे सुकेणे ता. निफाड, निवृत्ती बाबुराव काश्मिरे (५४) रा. सातपूर नाशिक, ज्ञानेश्वर कुंडलिक वाघ (५२) रा. आंबेदिंडोरी ता. दिंडोरी हे नाशिककडे येत होते. पुणे-नाशिक रस्त्यावर पहाटे सव्वा पाचच्या सुमारास तांबडेमळा-भोरवाडी येथे आय 20 कार आली असता रस्त्यावर कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी चालक रमेश सोनवणे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्यालगतचा डिव्हाईडर आणि लोखंडी बोर्ड तोडून बाजूच्या खड्ड्यात कोसळली. यावेळी गाडी एका झाडाला अडकली. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ तसेच शिवनेरी येथून शिवज्योत घेवून जाणारे शिवप्रेमी यांनी मोबाईलच्या प्रकाशात गाडीत अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. जखमींना मंचर उपजिल्हा रूग्णालयात नेले असता अपघातातील रमेश सोनवणे, बबन तिडके यांचे वैद्यकीय तपासणीपूर्वीच निधन झाले. निवृत्ती काश्मिरे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. मृत रमेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. पोलिस कर्मचारी बबन तिडके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रमेश आणि बबन यांच्या मृतदेहाचे मंचर उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सोनवणे यांचा पार्थिवावर सायंकाळी खेडगांव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अपघातातील जखमींवर नाशिक येथे खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.