चेहेडीजवळ अपघात; दोघा मित्रांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:26 AM2020-02-15T01:26:46+5:302020-02-15T01:29:03+5:30
चेहेडी पंपिंगजवळ आरंभ महाविद्यालयातील तिघा विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात घडला. त्यातील दोघे विद्यार्थी ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले आहे. ऐन व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन दिवसांनी साखरपुडा होणार असल्याने विवाहाची स्वप्ने बघणाऱ्या आकाश गवळीचा या अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने आयुष्याची साथीदारासोबत सुरुवात होण्यापूर्वीच अर्ध्यावरती डाव मोडला.
नाशिकरोड : चेहेडी पंपिंगजवळ आरंभ महाविद्यालयातील तिघा विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात घडला. त्यातील दोघे विद्यार्थी ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले आहे. ऐन व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन दिवसांनी साखरपुडा होणार असल्याने विवाहाची स्वप्ने बघणाऱ्या आकाश गवळीचा या अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने आयुष्याची साथीदारासोबत सुरुवात होण्यापूर्वीच अर्ध्यावरती डाव मोडला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील तिसरा विद्यार्थी जखमी आहे. या घटनेमुळे चेहेडी पंपिंग विजयनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
साखरपुड्यापूर्वीचा आकाशचा करूण अंत
अपघातात मृत्यू झालेला आकाश गवळी याचा दोन दिवसांनी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवत
असताना हात पिवळे होण्यापूर्वीच अपघातात आकाशचे दुर्दैवी निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, विजयनगर येथील आदर्श रोहिदास कराड (१८), आकाश राजू गवळी (१८), ज्ञानेश्वर बाळू केदारे (१८) हे तिघे मित्र आरंभ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास हे तिघे विद्यार्थी मित्र दुचाकीवरून विजयनगर येथे घरी जात होते. त्यावेळी मातीने भरलेल्या ट्रकच्या चालकाने भरधाव वेगाने जात दुचाकीला धडक दिली. यामध्ये आदर्श कराड, आकाश गवळी हे दोघे हायवा ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले व ज्ञानेश्वर केदारे हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे.दोघा विद्यार्थ्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.