कोतुळकर परिवारावर संकटाचे आभाळ कोसळले पेठ येथील घराला आग लागल्याने दुर्घटना नोटा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:15 PM2017-12-17T23:15:31+5:302017-12-18T00:19:21+5:30
काबाडकष्ट करून हक्काचे छप्पर असावे यासाठी पै पै जमा केलेला पैसा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पेठ येथील कोतुळकर परिवारावर संकटाचे आभाळ कोसळले आहे.
पेठ : काबाडकष्ट करून हक्काचे छप्पर असावे यासाठी पै पै जमा केलेला पैसा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पेठ येथील कोतुळकर परिवारावर संकटाचे आभाळ कोसळले आहे.
येथील तहसील कार्यालय परिसरात पुष्पा कृष्णा कोतुळकर या भाडेतत्त्वावर घरात राहतात. आपलेही हक्काचे घर असावे यासाठी त्यांनी मिळेल ते काम करून, घर खर्चात काटकसर करून जवळपास ८० ते ९० हजार रुपयांची बचत करून ते घरात ठेवले होते. रविवारी सकाळी नित्यदेवपूजा करून त्यांनी दिवा लावला होता. त्याच सुमारास उंदराने दिव्यातील पेटती वात पळवून शेजारी ठेवलेल्या कपड्यांजवळ नेली. यात कपड्यांनी पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत जवळपास ९० हजार रुपयांच्या नोटा अर्धवट स्थितीत जळाल्या. तसेच पंखे, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. कृष्णा कोतुळकर हे खाजगी ड्रायव्हर असून पुष्पा या मोलमजुरी करून उदरिनर्वाह करतात.