शिंगवेत शालेय व्हॅनला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:29 PM2020-02-01T23:29:01+5:302020-02-02T00:09:32+5:30
चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारात कांचन सुधा शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन शनिवारी (दि. १) सकाळी ९ वाजेच्या सुमारास उलटून झालेल्या अपघातात ८ ते १० विद्यार्थी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे.
मनमाड/दरेगाव : चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारात कांचन सुधा शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन शनिवारी (दि. १) सकाळी ९ वाजेच्या सुमारास उलटून झालेल्या अपघातात ८ ते १० विद्यार्थी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर सदर व्हॅन पंचनामा होण्यापूर्वीच तेथून शाळेत नेऊन ठेवत ताडपत्रीने झाकून ठेवल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मनमाड शहरापासून सुमारे ३ किमी अंतरावर लासलगाव मार्गावर कांचन सुधा इन्स्टिट्यूटची शाळा असून, त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. नर्सरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन व्हॅन जात असताना चांदवड रोडवर ती उलटली. व्हॅनने तीनदा पलटी खात ती रस्त्यालगत असलेल्या कांद्याच्या वखारीजवळ जाऊन उलटली. या अपघातामुळे व्हॅनमध्ये असलेल्या चिमुकल्यांच्या किंचाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांना वाहनातून बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अथर्व हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. डॉ. शांंताराम कातकडे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार केले. मात्र स्मित उबाळे, यश मंडल आणि अथर्व खैरनार या तिघांना जास्त मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे
पाठवले. या वाहनात एकूण २५ विद्यार्थी होते. पालकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.
दरम्यान अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन तातडीने घटनास्थळा वरून हलवण्यात आल्याचे कळताच नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
फोटो- ०१ मनमाड स्कूल बस या नावाने सेव्ह.
जखमी विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलेल्या अथर्व हॉस्पिटलबाहेर पालकांनी केलेली गर्दी.
तर
प्रकरण दडपण्याचा आरोप
अपघातानंतर पोलीस येण्यापूर्वीच सदर वाहन घटनास्थळावरून हलवून शाळेच्या आवारात ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले. त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला. अपघाताचा पंचनामा होणे गरजेचे असताना वाहन घटनास्थळावरून हलविण्यात आल्यामुळे एका प्रकारे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिक व पालकांनी केला. एका वाहनाची आसनव्यवस्था केवळ दहा सीटची असताना व्हॅनमधून २५ जणांना दाबून भरून वाहतूक केली जात असल्याबद्दलही पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पालकांची तक्र ार दाखल नसल्याचे चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी सांगितले.
शाळा प्रशासनाला निवेदन
शालेय व्हॅनला झालेल्या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शालेय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावणाºया बेजबाबदार विद्यार्थी वाहतुकीबद्दल शाळा प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी मनमाड शहर रिपाइंचे वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर राजेंद्र अहिरे, गंगाभाऊ त्रिभुवन यांची नावे आहेत.