वणी-नाशिक रस्त्यावरील अपघाताचे सत्र सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:41 PM2020-12-15T19:41:30+5:302020-12-16T00:50:25+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील वणी ते नाशिक हा दुय्यम दर्जाचा महामार्ग प्रवासी वर्गासाठी दिवसेंदिवस डोकेदुखीचा विषय बनत चालला आहे. सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे कानाडोळा यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघातांची शृंखला केव्हा खंडित होणार, असा सवाल प्रवासी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
वणी ते नाशिक हा रस्ता दळणवळणाच्या माध्यमातून महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्याने गुजरात जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या कंपन्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक या रस्त्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर होत असते. तसेच दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, नाशिक आदी तालुक्यातील भाजीपाला सुरतच्या बाजारपेठेत याच रस्त्याने नेला जातो. तसेच कंपन्यामध्ये तयार झालेल्या पक्क्या मालाची निर्यातदेखील याच रस्त्याने होते. त्यामुळे हा रस्ता दळणवळणांच्या माध्यमातून महत्त्वाचा मानला जातो. व वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत असते. गुजरातहून जास्त भाविक शिर्डी येथे याच रस्त्याने प्रवास करीत असतात. तसेच सापुतारा हे पर्यटन क्षेत्र पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील प्रवासी या रस्त्याने ये-जा करीत असतात. महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी गड याच महामार्गावर येत असल्यामुळे देशातील अनेक भागातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हा रस्ता सर्व बाजूने महत्त्वाचा मानला गेला आहे; परंतु या रस्त्याने प्रवास करताना प्रवासी वर्गाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या रस्त्याची आता नव्याने दुरुस्ती करण्यात आल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या रस्त्यावरील अपघातात काही जणांना प्राणाला मुकावे लागले आहे, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे. सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे कानाडोळा या गोष्टी वाढत्या अपघातांना कारणीभूत असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी वळण रस्ता आहे. या वळणांवर सूचना देणारे फलक नाहीत. त्यामुळे वाहनधारकाला रस्त्यांचा अंदाज कळत नाही. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी वळण आहे, त्या ठिकाणी तसेच वेगवेगळ्या फाट्यावर दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.