कसारा घाटात टॅँकरला अपघात
By Admin | Published: May 14, 2016 10:43 PM2016-05-14T22:43:02+5:302016-05-14T22:51:31+5:30
वाहतूक ठप्प : जीवितहानी नाही
इगतपुरी : मुंबई - आग्रा महामार्गावर कसारा घाटात अवघड वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसने भरलेला टॅँकर रस्त्यावर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, वाहतूक ठप्प होऊन महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई - आग्रा महामार्गावर कसारा घाटालगत लतीफवाडीनजीक नाशिककडे जाणाऱ्या इंडेन कंपनीचा टॅँकर (जीजे ०६ ६२१४ ) वळणावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने महामार्गावरच उलटला. यामुळे नाशिककडे येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती; मात्र या अपघातात जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी इगतपुरी- घोटी टॅबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी तत्काळ शहापूर टॅबचे सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांना कळवले. तसेच याबाबत कर्मचारी घेऊन त्यांनी लतीफवाडीजवळ ठप्प झालेली मुंबईकडे व त्याचबरोबर नाशिककडील वाहतूक टप्प्याटप्प्याने वळवली. या गाडीचा चालक फरार झाला आहे.
दरम्यान, या वेळी गॅस ज्वलनशी असल्याने आग पकडू नये म्हणून मुंबई -आग्रा महामार्गावरील लतीफ वाडी व कसारा गावाजवळ दोन्ही महामार्ग घटनास्थळापासून दीड किमी अंतरावर बंद करण्यात आले होते. यानंतर या गॅस गळती रोखणारे कंपनीचे तज्ज्ञ यांनी गॅस गळती दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बंद केली व दोन्ही महामार्ग सुरळीत करण्यात आले. यावेळी घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरस याच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .