देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, नाशिकमध्ये भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 07:54 AM2018-06-07T07:54:14+5:302018-06-07T10:34:28+5:30

मनमाडमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Accident of Two vehicles in Nashik, 5 dead | देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, नाशिकमध्ये भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, नाशिकमध्ये भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

Next

नाशिक - मनमाडमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळच्या सोग्रस गावाजवळ ही भीषण दुर्घटना घडली आहे. आडगाव शिवारात गुरुवारी पहाटे 5.50 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वाळूच्या ट्रकमध्ये बिघाड झाल्याने हा ट्रक रस्त्याशेजारी उभा होता. यावेळी याच मार्गावरुन जाणाऱ्या  लक्झरी मिनी बसचे अचानक टायर फुटल्यानंतर बस ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात दहा जण जागीच मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत.  मृत्युमुखी पडलेले सर्व जण उल्हासनगर व कल्याण परिसरातील रहिवासी होते. मृतांची ओळख पटवण्याचे कार्य सध्या सुरू आहे. दरम्यान, हे सर्व जण ओंकारेश्वर उज्जैन येथील देवदर्शन  करुन उल्हासनगरकडे परतत असताना काळा त्यांच्यावर घाला घातला. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष, एक लहान मुलाचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजीव नागदेव यांची साई ट्रॅव्हल्सची मिनी बस क्रमांक एमएच 05/सी के 357 हे बस सोमवारी बस चालक संतोष किसन पिठले ( वय 38 वर्ष, उल्हासनगर) हे सुमारे 22 प्रवाशांना घेऊन ओंकारेश्वर महाकालेश्वर उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करुन सर्व प्रवासी उज्जैन येथून बुधवारी (6 जून) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास परतीच्या प्रवासात लागले होते. ते चांदवड मार्ग जात असताना चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा येथे  5.50 वाजण्याच्या सुमारास नादुरुस्त ट्रक रस्त्याशेजारी उभा होता. याचदरम्यान मिनी बसचे अचानक टायर फुटले व बसचा ताबा सुटून बस ट्रकवर जाऊन आदळली व अपघात झाला. अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यावेळी सोमा कंपनीचे गस्तीपथक रुग्णवाहिका सरकारी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मृत व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे केवळ दोन डॉक्टर असताना त्यांनी उपचार सुरू केले. दरम्यान चांदवड शहरातील खासगी डॉक्टरांना मदत कार्यासाठी बोलावण्यात आले. त्यात डॉक्टर जीवन देशमुख, डॉक्टर संदीप देवरे, डॉक्टर कुंभार्डे, डॉ. सतीश गांगुर्डे यांनी औषध उपचार केले. जखमी 13 पैकी नऊ जणांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. 

जखमींमध्ये गीता कालिदास वासोदा ( ३८, कल्याण ), राधी तुळशी राठोड (४०), जमना गोविंद चव्हाण (७०), मंजू सुनील गुजराती (31), प्रगती सुनील गुजराती (12), कशिक प्रकाश घाव (१४), कल्याण बिंदिया पानु गुजराती (६०,नाशिक),  धनु मधुकर परमार (६०, नाशिक)  वसु लक्ष्मण दुमय्या ( ५४,कांदिवली ), ब्रिजेश मल्होत्रा ( 20, कांदिवली),  अजय मल्होत्रा (४५,कल्याण ) चालक संतोष किसन पिठले मिनी बस मधील 12 जणांचा समावेश आहे.

तर ट्रकचा क्लीनर पूनम कोंडाजी माळीचा (पळसदर ता . मालेगाव) हात फ्रॅक्चर झाला आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक अनंत मोहिते उपनिरीक्षक कैलस चौधरी रामचंद्र जगताप व पोलीस कर्मचारी यांनी मदत कार्य केले. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Accident of Two vehicles in Nashik, 5 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.