चांदवडच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:16 AM2021-05-06T04:16:05+5:302021-05-06T04:16:05+5:30
देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख सध्या रजेवर असल्याने चांदवडचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे देवळ्याचा अतिरिक्त ...
देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख सध्या रजेवर असल्याने चांदवडचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे देवळ्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत देवळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील तहसील कार्यालयात तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक झाल्यानंतर महेश पाटील आपले शासकीय वाहन असलेल्या मार्शल जीपने चांदवडकडे परत निघाले होते. या वेळी विंचूर - प्रकाशा मार्गावरील गोदावरी हॉटेल परिसरात समोरून भावड घाटाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टीगा गाडीने मार्शल जीपला जोरदार धडक दिल्यामुळे गाडी उलटली. अपघात झाल्यानंतर परिसरातील शेतकरी मदत कार्यासाठी धावून आले. या वेळी गाडीच्या काचा फोडून महेश पाटील व गाडीच्या चालकाला बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.