येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात,6 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 07:21 AM2018-11-21T07:21:20+5:302018-11-21T11:20:19+5:30
येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नाशिक - येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बुधवारी (21 नोव्हेंबर) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. अर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अर्टिगामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. अनकाई बारी जवळील ही दुर्घटना आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये अर्टिगा कारचा अक्षरशः चुराडा झाला. शिवाय, मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेऊन अपघातग्रस्त गाड्या वेगळ्या करण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेले सर्व जण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी होते.
कोपरगाव शहरातील बाबा पान स्टॉलचे मालक हे बाबा अनाड नावाने प्रसिद्ध आहेत. या दुर्घटनेत त्यांची पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि नातू या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. इंदुर(मध्य प्रदेश) हून माघारी येत असताना हा अपघात झाला.
मृतांची नावे
बाळासाहेब मुरलीधर अनाड ( वय 60 वर्ष)
इंदूबाई बाळासाहेब अनाड ( वय 55 वर्ष)
श्रीनाथ बाळासाहेब अनाड ( वय 25 वर्ष)
मोहिनी गणेश खांदवे (वय 35 वर्ष, तेलीखुंट,नगर)
हरी गणेश खांदवे ( वय 5 वर्ष )
भीमाबाई बापू रोकले ( वय 70 वर्ष)
आयशर गाडी मनमाडच्या दिशेनं जात होती, तर अर्टिगा कार ही येवल्याच्या दिशेने जात प्रवास करत होती. यादरम्यान, दोन्ही गाड्या येवला-मनमाड मार्गावर समोरासमोर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.