दुर्घटना टळली : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे देवगिरी एक्स्प्रेस बचावली
By Admin | Published: August 3, 2016 12:27 AM2016-08-03T00:27:01+5:302016-08-03T00:27:21+5:30
कसारा घाटात मध्यरात्री रेल्वेमार्गावर दरड कोसळली
इगतपुरी : कसारा घाटातील रेल्वेमार्गावर काल मध्यरात्री दरड कोसळल्याने मुंबईहून नाशिकडे येणारा एकेरी रेल्वेमार्ग ठप्प झाला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे देविगरी एक्स्प्रेस कसारा स्थानकातच थांबविण्यात आल्याने त्यातील प्रवाशी बचावले.
गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरीत धो धो पाऊस पडत असल्याने काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कसारा घाटातील टी. जी. आर. ३ जवळील जव्हार फाट्याजवळ रेल्वे रुळावर मोठी दरड कोसळली. त्याचदरम्यान कसारा स्थानकातून मुंबईहून नाशिककडे येणारी देविगरी एक्स्प्रेस नाशिककडे सोडण्यात आली. मात्र घाटात दरड कोसळल्याची रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच सदर घटनेची माहिती त्यांनी कसारा स्थानकात कळविली. माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने देविगरी एक्स्प्रेस थांबवल्याने मोठी दुर्घटना व जीवितहानी टळली. सदरची एक्स्प्रेस पुन्हा कसाऱ्याच्या दिशेने माघारी फिरवून दुसऱ्या ट्रॅकवर आणून नाशिकला रवाना करण्यात आली.
या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. देविगरी एक्स्प्रेस थोडक्यात बचावली. रात्री साडे बारा ते सकाळी 9 वाजेपर्यंत या अपघात ठिकाणी मातीचा ढिगारा उपसण्याचे काम चालू होते. सकाळी ९ वाजता हा रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले. (वार्ताहर)