केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांकडून दुर्घटनाग्रस्त झोपडपट्टीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:05 PM2018-10-29T17:05:26+5:302018-10-29T17:06:18+5:30
मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टीतील जळालेल्या झोपड्यांची वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टीतील जळालेल्या झोपड्यांची वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. गेल्या शनिवारी नागछाप झोपडपट्टीला आग लागून सुमारे १०० झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी साहित्य व इतर नुकसान झाले आहे. या जळीत झोपडपट्टीतील घरांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सोमवारी पाहणी करुन नुकसानीचा आढावा घेतला. यानंतर येथील शासकीय विश्राम गृहावर पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे म्हणाले की, शहरात मोठी दुर्घटना झाली. शंभर झोपड्यांमधील रहिवाशांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. लग्नाचा बाजारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. अत्यंत दाट लोकवस्ती व अरूंद रस्त्यांमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होते; मात्र अग्निशमन दल, पोलीस व महापालिका प्रशासनाने चांगले काम करुन आग आटोक्यात आणली. या आगीच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे केले जातील. नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी उपाययोजना केल्या जातील. सद्यस्थितीत या दुर्घटनाबाधित नागरिकांची स्थलांतर व निवारा व जेवणाची सोय करणे गरजेचे आहे. यासाठी शासन पातळीवर उपाययोजना केल्या जातील. सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. झोपडपट्टीमधून या नागरिकांना शासनाच्या म्हाळदेशिवारातील घरकुल योजनेत स्थलांतरीत करण्यासाठी त्यांचे मत परिवर्तन केले जाईल. तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील. पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांनी शासकीय विश्रामगृहावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करुन आढावा बैठक घेतली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष लकी गिल, तालुकाध्यक्ष दीपक पवार, नितीन पोफळे, निलेश कचवे, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक रत्नाकर नवले, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे आदिंसह अधिकारी उपस्थित होते.