अपघातग्रस्त युवकाने रुग्णवाहिकेतून येऊन केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:32 AM2019-04-30T01:32:57+5:302019-04-30T01:33:14+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी सिडको व अंबड भागात मोठ्या प्रमाणात मतदारांंनी मतदानाचा हक्क बजाविला, यात अपघात झालेले तसेच आजारामुळे दवाखान्यात दाखल असलेल्यांनी मतदान करण्याबरोबरच कामटवाडे येथील मनपा शाळेत शैलैश सुभाष शिरोडे यांनी रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला.
सिडको : लोकसभा निवडणुकीसाठी सिडको व अंबड भागात मोठ्या प्रमाणात मतदारांंनी मतदानाचा हक्क बजाविला, यात अपघात झालेले तसेच आजारामुळे दवाखान्यात दाखल असलेल्यांनी मतदान करण्याबरोबरच कामटवाडे येथील मनपा शाळेत शैलैश सुभाष शिरोडे यांनी रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला.
सिडको भागात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या. दुपारी उन्हामुळे काही प्रमाणात कमी झालेली गर्दी ही सायंकाळच्या सुमारास पुन्हा दिसून आली. कामटवाडे येथील रहिवासी शैलेश सुभाष शिरोडे यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला असल्याने ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी मतदान असल्याने त्यांनी रुग्णालयात असतानाही मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते आबा पवार, भूषण सोनजे, किरण पारकर, कमलेश खैरणार यांनी त्रिमूर्ती हॉस्पिटलच्या वतीने मोफत रुग्णवाहिकेची सोय झाल्याने शिरोडे यांना कामटवाडे येथील शाळेत रुग्णवाहिकेमध्ये नेत त्यांनी मतदानाचा हक्क
बजावला. तसेच सिडकोतील दत्तचौक भागातील ज्येष्ठ नागरिक तुकाराम वाघ (८५) यांना चालणेही मुश्कील असल्याने त्यांना स्वप्नील गामणे व स्वप्नील चिंचोरे या युवकांनी वाघ यांना खुर्चीच्या सहाय्याने मोरवाडी येथील मतदान केंद्रापर्यंत नेल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक म्हसरूळ येथील रहिवासी प्रमिला प्रकाश चौरे यांचा अपघात झालेला असून, अपघातात पाय फ्रॅक्चर झाला आहे. परंतु त्यांनीही सिडको उंटवाडी येथील माध्यमिक विद्यालयात रुग्णवाहिकेमध्ये येत मतदानाचा हक्क बजाविला.