गायकवाड समितीच्या अहवालानुसार दोषींवर लवकरच कारवाई
By Admin | Published: June 23, 2017 05:18 PM2017-06-23T17:18:58+5:302017-06-23T17:18:58+5:30
आदिवासी विकासमंत्र्यांचा निर्वाळानोकरभरती भ्रष्टाचाराचा अहवाल विधी समितीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : न्या. गायकवाड समितीच्या अहवालानुसार भ्रष्टाचाराचा ठपका ठेवलेले माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी त्याबाबतचे संकेत शुक्रवारी (दि. २३) नाशिक दौऱ्यात दिले.
आदिवासी विकास विभागात परिसर सेवा संस्थांकडून वसतिगृह व आश्रमशाळा सुधारणा व अंमलबजावणीसाठी बोलविण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी ते नाशिकला आले होते. या सेवा संस्थांनी सुचविलेल्या सूचना निश्चितच आदिवासी विकास विभागासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग नेहमीच खरेदी आणि निविदांच्या प्रकारामुळे चर्चेत येतो. त्याला फाटा देण्यासाठी यावर्षापासून विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या १७ वस्तूंचा थेट लाभ आदिवासी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी करीत या विद्यार्थ्यांच्या खात्यावर ६० टक्के रक्कमही वितरित करण्यात आल्याचे सावरा यांनी सांगितले.