बनावट दावे दाखल करून लेखापालाने आयकर विभागाला १७ कोटींना फसविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 02:45 AM2019-09-12T02:45:21+5:302019-09-12T06:40:35+5:30
मोठ्या कंपन्यांसह निमसरकारी कर्मचाऱ्यांचे दिले स्वतंत्र विवरणपत्र
नाशिक : एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने एचएएलसह विविध बड्या कंपन्या व निमसरकारी विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाऱ्यांचे मागील चार वर्षांचे आयकर विवरणपत्र स्वतंत्रपणे तयार करून ते दाखल करत, आॅनलाइन दाव्यांमार्फत कर्मचाºयांच्या नावाने आयकर विभागासह सरकारची सुमारे १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयित किशोर राजेंद्र पाटील विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पाटील याने २०१६ ते २०१९ पर्यंत महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, बॉश, सिएट, सीएनपी-आयएसपी, एमएसईबी, ग्राफाईट, गायत्री पेपर, एचएएलसह एकूण १० कंपन्या व निमशासकीय विभागातील १,८८८ कर्मचाºयांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे आयकर विभागाला आढळले आहे.
पाटीलने कर्मचाºयांचे स्वतंत्ररीत्या आयकर विवरणपत्रांद्वारे दावे दाखल करताना विवरणपत्रांमध्ये गृह संपत्तीपासून नुकसान व विविध आयकर कलमांखाली बनावट कपात दाखवून कर्मचाºयांच्या नावे १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपये मूळ परतावा व्याजासह घेतला व कर्मचाºयांकडून शुल्कापोटी परताव्याच्या २० टक्के रक्कमही हडप केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पाटीलने ज्यांचे विवरणपत्र तयार केले, त्यांच्यापैकी २०० जणांचे जबाब आयकर विभागाने नोंदविले आहेत. बनावट दावे केलेल्यांना आयकर खात्याने पैसे परत करण्याचे सांगितले होते. त्यानुसार, ५७३ कर्मचाºयांनी मिळालेला परतावा व्याजासह परत केला. यातून ११ कोटी ५७ लाख रुपये सरकारजमा झाले आहेत.
पाटीलच्या कार्यालयाची झाडाझडती
आयकर अधिकारी धनराज बोराडे यांच्या पथकाने पाटीलच्या कार्यालयाची झडती घेतली. कागदपत्रे ताब्यात घेतली. काही कर्मचाºयांच्या वेतनातही पाटीलने फेरफार केल्याचे यावेळी समोर आले.