मनमानी पद्धतीने मतदार यादी केल्याचा आरोप
By admin | Published: December 25, 2014 01:49 AM2014-12-25T01:49:35+5:302014-12-25T01:50:49+5:30
मनमानी पद्धतीने मतदार यादी केल्याचा आरोप
येवला : येवला औद्योगिक सहकारी वसाहत संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणूक कार्यक्रमास दिलीप तक्ते व संजय कांबळे या दोन सभासदांनी जोरदार हरकत घेतली आहे. प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांनी मनमानी करून स्वत:च्या अधिकारात तात्पुरती मतदार यादी तयार करून घेतली असल्याचा आरोप केला आहे. यामुळे वसाहतीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
यासंबंधी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात उभयतानी म्हटले आहे, तात्पुरत्या मतदार यादीमध्ये दाखवलेल्या सभासदांपैकी अनेक सभासद मतदानास अपात्र आहेत. त्यांनी सहकार कायदा व पोटनियमानुसार सभासदत्वाचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नाही. निवडणूक प्रक्रियेसाठी नियमावली तयार केलेली नाही. जोपर्यंत नियमावली तयार होत नाही तोपर्यंत निवडणूकप्रक्रिया सुरू करता येत नाही. कोणत्या मतदारसंघातील सभासदाने कोणास मतदान करावयाचे याबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. संबंधित निवडणूक सहकार कायद्यातील तरतुदीनुसार बेकायदेशीर होणार आहे. कारखानदार मतदारसंघातून आठ प्रतिनिधी घेणे आवश्यक आहे. तशी तरतूद पोटनियम क्र. १ चा १२ (अ) मध्ये आहे. कारखानदार या व्याखेला पात्र असलेले सहकारी संस्था व ट्रस्ट अॅक्टखाली नोंदवलेल्या संस्थांना या निवडणुकीत भाग घेता येतो. पोटनियम या नियमानुसार निवडणूक कोणत्या जागेसाठी व किती प्रतिनिधीसाठी आहे हे निवडणूक कार्यक्रमात कोठेही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर आहे, असे निवेदनात म्हटले आहे. हरकतीचा विचार करून तत्काळ निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम
जाहीर करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. मतदार यादीत अनेक दोष असल्याने नियमानुसार सभासद यादी बनवावी असे निवेदनात म्हटले असून, काही
संस्था सभासदत्वाचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करत नसल्यामुळे त्या संस्थांना मतदार यादीतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (वार्ताहर)