विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:07 AM2019-04-18T01:07:25+5:302019-04-18T01:07:43+5:30
बदनामी तसेच मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सातत्याने दबाव आणल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जुन्या नाशकात उघडकीस आली आहे.
नाशिक : बदनामी तसेच मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सातत्याने दबाव आणल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जुन्या नाशकात उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी विवाहितेने लिहिलेल्या चिठ्ठीवरून आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला आहे. संशयितांचा भद्रकाली पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बागवानपुरा येथील कुरैशी कुटुंबातील विवाहिता नजमा आजाद कुरैशी (४०) या महिलेने छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत सोमवारी (दि.१५) सायंकाळी आत्महत्या केली. त्यावेळी आत्महत्येमागील कारण समजू शकले नव्हते. मात्र अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर घराची झाडाझडती घेतली असता पोलिसांंना नजमा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी पतीसोबत वाहनचालक म्हणून काही महिन्यांपूर्वी काम करणारा संशयित आमिन रफिक मन्सुरी (रा. चेहेडी पंपिंग) व रफिक मन्सुरीसह त्याच्या कुटुंबीयांच्या नावाचा उल्लेख केला आहे. हे कुटुंबीय मुलीचे संसार मोडण्याची धमकी देत माझी समाजात बदनामी करण्याचे सांगून एक कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा मजकूर चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मयत नजमा यांचे पती आजाद यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित मन्सुरी कुटुंबीयांविरुद्ध पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक देवीदास इंगोले करीत आहेत.