ईघे खुनातील आरोपीस सात तासांत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:49 AM2021-11-27T01:49:39+5:302021-11-27T01:53:08+5:30
भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष अमोल ईघे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विनोद बाळासाहेब बर्वे याला पोलिसांनी अवघ्या सात तासांत अटक केली असून ईघे यांची हत्या राजकीय वादातून नव्हे, तर युनियनच्या वर्चस्ववादातून झाल्याचा दावा पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सातपूर पोलीस ठाण्याच सायंकाळी पत्रकार परिषद घेत केला आहे.
सातपूर : भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष अमोल ईघे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विनोद बाळासाहेब बर्वे याला पोलिसांनी अवघ्या सात तासांत अटक केली असून ईघे यांची हत्या राजकीय वादातून नव्हे, तर युनियनच्या वर्चस्ववादातून झाल्याचा दावा पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सातपूर पोलीस ठाण्याच सायंकाळी पत्रकार परिषद घेत केला आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी सकाळी भाजपचे पदाधिकारी अमोल ईघे यांची हत्या करून हल्लेखोर पसार झाला होता. या प्रकरणात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लखोराला पकडण्यासाठी पोलिसांची तीन चार पथके रवाना करण्यात आली होती. यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने संशयित आरोपी विनोद बाळासाहेब बर्वे (रा. श्रमिकनगर) याला ठाणे जिल्ह्यातून अटक केल्याचे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही हत्या राजकीय वादातून झालेली नाही, तर युनियनच्या वादातून करण्यात आल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपीने राष्ट्रवादी प्रणित वंचित कामगार संघ ही युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने बर्वे याने ईघे याची हत्या केली असून, आरोपीवर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत, असेही खरात यांनी सांगितले. यावेळी साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक किशोर मोरे उपस्थित होते.