दागिने चोरीप्रकरणी आरोपीला अडीच वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 01:16 AM2020-12-18T01:16:10+5:302020-12-18T01:17:10+5:30
सराफाचे दुकान फोडून दागिने चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम. शहा यांनी अडीच वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी तीन हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
नाशिक : सराफाचे दुकान फोडून दागिने चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम. शहा यांनी अडीच वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी तीन हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. हसन हमजा कुट्टी (३९) आणि राजकिशोर लक्ष्मीकांत बोराल (दोघे रा. अश्वमेधनगर, पेठरोड) अशी आरोपींची नावे आहेत. हिरावाडी येथील माउली ज्वेलर्स येथे १७ ते १८ ऑगस्ट २०१८ रोजी चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटवून १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक डी. डी. इंगोले यांनी केला व दोघांना पकडले. इंगोले यांनी तपास करून दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ए. बी. कारंडे यांनी युक्तिवाद केला. त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हसन कुट्टी व राजकुमार बोराल यांनी घरफोडी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार न्यायालयाने दोघांना अडीच वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.