जिल्हा परिषदेकडून ३० खासगी रुग्णालये अधिग्रहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:45+5:302021-04-16T04:14:45+5:30
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते रुग्ण व त्याप्रमाणात अपुऱ्या असलेल्या आरोग्य सुविधा लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते रुग्ण व त्याप्रमाणात अपुऱ्या असलेल्या आरोग्य सुविधा लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात असलेल्या रुग्णालयांची व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्याबरोबरच ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयेही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिग्रहित केले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापेक्षा यंदा अधिक वेगाने व मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवरच अतिरिक्त ताण पडून त्यांच्या मर्यादाही संपुष्टात येऊ लागल्या आहेत. गेल्या वर्षी ग्रामीण भागातील रुग्णांसाठी नाशिक शहरातील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तसेच घोटीच्या एसएमबीटी रुग्णालयात य करण्यात आली होती. काही रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन बरेही झाले होते. यंदा मात्र ही सारीच यंत्रणा अपुरी पडू लागल्याचे वाढत्या रुग्णसंख्येने अधोरेखित झाले असून, त्यापासून धडा घेत आरोग्य विभागाने बळकटीकरणावर भर दिला आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असलेल्या खाटा वाढविण्याबरोबरच पुरेशी साधनसामग्री पुरविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भरीस भर म्हणून मनमाडचे रेल्वे हॉस्पिटल, एकलहरे येथील मातोश्री हॉस्पिटल, देवळाली कॅम्पचे सेवा सुपर स्पेशालिटी, दिंडोरीचे क्षीरसागर, श्रीदत्त कृपा, स्वामी समर्थ यांच्यासह येवला, सिन्नर, बागलाण, इगतपुरी, निफाड व नांदगाव येथील सुमारे ३० हून अधिक खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात येऊन याठिकाणी कोरोना रुग्णांना दाखल करण्यात येत आहे.
चौकट===
ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण
कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय व्हावी म्हणून तालुक्याच्या मुख्यालयी असलेल्या ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण केले जात असून, त्यात प्रामुख्याने दाभाडी, नामपूर, पिंपळगाव बसवंत, वणी, इगतपुरी, मनमाड, पेठ, सुरगाणा, गिरणारे आदी ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये सरासरी सध्या उपलब्ध असलेल्या खाटांच्या संख्येइतक्याच म्हणजेच ३० ते ४० नवीन खाटा ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह नव्याने तयार केल्या जात आहेत. यातील काही कार्यान्वित झाल्या असून, काही ठिकाणी ऑक्सिजनची पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.